सिंधुदुर्गनगरी : समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्याच शिफारशीचेच घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजूर केले जातात. मात्र सदस्यांच्या शिफारसपत्रांना किंमत दिली जात नसल्याचा आरोप सदस्या वृंदा सारंग यांनी करत सभापती जाधव यांना घरचा आहेर दिला. तर या विधानानंतर आक्रमक झालेल्या सभापतींनी कोणत्या लाभार्थ्यांवर अन्याय झाला तो दाखवून द्यावा असे खुले आव्हान सभागृहात दिले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाची मासिक सर्वसाधारण सभा समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, नम्रता हरदास, प्रतिभा घावनळकर, सुकन्या नरसुले, पुष्पा नेरूरकर, वृंदा सारंग, समिती सचिव तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी मारुती जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी संतापलेल्या सारंग यांनी प्रशासनाकडून आपल्या घरकुलच्या तीन प्रस्तावांबाबत कोणतीच कल्पना दिली नसल्याचे सांगितले. मात्र हे तुम्हाला कळवणारच कोण तुम्हीही या संस्थेचे विश्वस्त आहात. त्यामुळे तुम्हीच प्रशासनाची संपर्क साधायला हवा व आपली कामे करून घ्यायला हवीत असे सुनावले. तसेच सर्व तालुक्यांना समान न्याय देणारा सभापती असल्याचे सांगून कोणावर अन्याय झाल्यास तो दाखवून द्यावा असे आव्हान दिले. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना ग्रामसेवक व सरपंचांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, यासाठी यावर्षी केवळ ३१ प्रस्तावच दाखल झाले आहेत. तसेच अपंग विद्यार्थी म्हणून ५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी असताना अपंग शिष्यवृत्तीसाठी केवळ ३२ प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती सभेत देण्यात आली. याबाबत सदस्य सुरेश ढवळ यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला. सभापतींनी यात हस्तक्षेप करत केवळ समाजकल्याण विभागच जबाबदार नसून स्वत:सह समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधीही कमी पडत असल्याचे सांगितले. याबाबत लोकप्रतिनिधीनी तेवढ्याच जागरुकतेने काम करणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच हे प्रस्ताव वाढविण्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती करण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना काढा असे आदेशही सभापती जाधव यांनी दिले. सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सभेला गैरहजर राहिल्याबाबत त्यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचे आदेश जाधव यांनी दिले. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रचार प्रसिद्धी केली जात नाही. ते लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच रहात असल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी) घरकुल योजना : सदस्यांना किंमत दिली जात नाही ४जिल्हा परिषद सदस्या वृंदा सारंग या घरकुल प्रस्ताव मंजूर करण्याच्या विषयावरून आक्रमक झाल्या. दिलेले घरकुल प्रस्ताव मंजूर न केले गेल्याबद्दल वृंदा सारंग यांनी सभागृहात आवाज उठवत सभापतींना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. केवळ सभापतींच्या शिफारशीनेच घरकुल प्रस्ताव मंजूर केला जातो. सदस्यांच्या शिफारसपत्रांना किंमत दिली जात नसल्याचा आरोप केला. तर सुरेश ढवळ यांनी किमान समिती सदस्यांचे प्रस्ताव तरी प्राधान्याने मंजूर करण्याची मागणी केली.
सभापतींना घरचा आहेर
By admin | Published: January 16, 2016 11:23 PM