सिंधुदुर्ग : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये दक्षिण कोकणातील बहुचर्चित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे मंगळवार ७ मे राेजी मतदान होणार आहे. मात्र, कोकणातील घरोघरी येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीचा उन्हाळा मुंबईतच काढावा लागणार आहे. कारण मुंबईतील सहा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे यावर्षी चाकरमान्यांना कोकणी मेव्याला मुकावे लागणार असल्याचे दिसत आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरातील एक तरी व्यक्ती उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्त मुंबईत स्थावर आहेत. मुंबई आणि उपनगरात असलेले हे सर्व चाकरमानी दरवर्षी, उन्हाळी सुट्टी, हाेळीचा सण आणि गणेशोत्सवात न चुकता कोकणात येतात. दरवर्षी उन्हाळ्यात येणारे चाकरमानी हे कोकणी मेव्याचा मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर चाकरमान्यांना गावचे वेध लागतात. यावर्षी मात्र मुंबईतील सर्वच मतदार संघात आणि ठाणे, कल्याण, पालघर या मतदार संघात २० मे ला ऐन उन्हाळ्यात मतदान होणार असल्याने मतदान होईपर्यंत चाकरमान्यांना गावी येता येणार नाही. कारण या अगोदर प्रचार आणि निवडणूक कार्यात चाकरमानी भाग घेणार आहेत.
२० मे नंतर हंगामाचा शेवटकोकणी मेव्यातील काजू, आंबा, कोकम, जांभूळ या फळांचा हंगाम साधारणपणे १५ एप्रिलनंतर सुरू होतो आणि २० मे नंतर संपायला लागतो. त्यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्याचे वेध लागतात. याच दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या सरी काेसळायला सुरूवात होतात. त्यामुळे २० मे नंतर हंगाम संपतो. त्यामुळे मतदान आटोपून कोकणात येतायेता हंगाम संपणार आहे.
ऐन उन्हाळ्यात उडणार धुरळारत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर ४ जूनला मनमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. यामुळे आता मार्च, एप्रिल मे महिना पूर्ण प्रचाराचा धुरळा उडणार आहे. याच काळात जिल्ह्यात कडाक्याचा उन्हाळा असतो. यावर्षी पाणीटंचाईची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हातच प्रचारसभा आणि प्रचाराने राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेनालाेकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राउत यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडून महायुतीकडून अद्यापही कोणाचेही नाव जाहीर झालेले नाही. भाजपा आणि शिंदे सेनेकडून या मतदार संघावर दावा दाखल केला जात आहे. मात्र, अद्याप ही जागा कोणाकडे आहे याची स्पष्टोक्ती झालेली नसल्याने याबाबत संभ्रम आहे.