कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात आलेले चाकरमानी आता मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांनी कणकवली बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर मंगळवारी मोठी गर्दी केली होती. चाकरमान्यांनी केलेल्या गर्दीमुळे बऱ्याच कालावधीनंतर बसस्थानक व रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजून गेला होता.गौरी - गणपतीचे विसर्जन केल्यानंतर चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत. कोरोनाच्या महामारी नंतर निर्बन्ध शिथिल झाल्यानंतर मुंबईतून हजारोच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गातगणेशोत्सवासाठी दाखल झाले होते. खासगी गाड्या, एसटी व त्यानंतर रेल्वे गाड्यांमधून गणेशोत्सवापूर्वी हे चाकरमानी सिंधुदुर्गातील आपल्या गावी पोहोचले होते. दरवर्षीप्रमाणेच आरती, भजने गणरायासमोर करण्यात आली. विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हे चाकरमानी भक्तिभावाने सहभागी झाले होते. चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आल्यावर एकप्रकारे मोकळा श्वास घेता आला होता. गणेशोत्सवात दीड, पाच तसेच सहाव्या दिवशी गौरी - गणपती व पुन्हा सातव्या दिवशी गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला परतू लागले आहेत. गणरायाच्या चरणी सर्व संकटे लवकर टळू दे, असे साकडे घालतानाच 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत हे चाकरमानी मुंबईला निघाले आहेत. बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी दुपारनंतर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. एसटी अथवा रेल्वे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाच 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष चाकरमानी करताना दिसत होते.
चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला! कणकवलीत एसटी, रेल्वे गाड्यांना गर्दी
By सुधीर राणे | Published: September 06, 2022 5:36 PM