खारेपाटण : जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु असतानाच जिल्ह्यात पुन्हा एकदा कुडाळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णआढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले खारेपाटण चेक पोस्ट जिल्हा सीमा तपासणी नाका येथील पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. तर छुप्या मार्गाने परजिल्ह्यातून येणाºया व्यक्तींना रोखण्याचे पोलिसांसमोर एक प्रकारे आवाहन उभे राहिले आहे.
याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी बुधवारी खारेपाटण चेकपोस्टला तातडीने भेट देत पाहणी केली. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. व खारेपाटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
खारेपाटण येथील चेकपोस्टवरील बंदोबस्त चुकवून संभाजीनगर (खारेपाटण) येथून कोरड्या नदीपात्रातून राजापूर तालुक्यातील काही नागरिक खारेपाटण बाजारपेठेत येत आहेत. व त्यांनी सोबत आणलेली वाहने रिक्षा, मोटरसायकल, टेम्पो ही वाहने खारेपाटण संभाजीनगर येथील मुंबई-गोवा महामार्गाजवळ शेजारी लावून नदीपात्रातून खारेपाटण बाजारात जात आहेत. ही माहिती खारेपाटण ग्रामसंनियंत्रण समितीला समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, तलाठी रमाकांत डगरे, महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, रफीक नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. व याबाबत पोलिसांना माहिती दिली. खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रावराणे यांनी या सर्व वाहनचालकांना ताब्यात घेतले.
खारेपाटण संभाजीनगर येथे गुरूवारी मुंबईहून आलेले व राजापूर मंगल कार्यालय येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेले एकूण ५ व्यक्ती तसेच मुंबई-नालासोपारा येथून थेट रिक्षा घेऊन आलेले ३ जणांचे कुटुंब, यामध्ये एक महिला गरोदर असल्याचे समजते. अशी मिळून १० माणसे खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ओलांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकत नसल्यामुळे सध्या ते खारेपाटण संभाजीनगर मधुबन हॉटेल आसपास मुंबई-गोवा महामार्ग येथे थांबून आहेत. मात्र कोरोनासारखा आजार फैलावलेला असताना संपूर्ण राज्य व देश लॉकडाऊन असताना सर्व तपासणी नाके चुकवून ही माणसे खारेपाटणपर्यंत पोहोचतातच कशी? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
छुप्या पद्धतीने जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तींना रोखणार कसे हे एकप्रकारचे पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवर थांबल्या आहेत. त्यांची पूर्ण चौकशी करून, त्यांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना पुढे पाठवायचे किंवा नाही ते ठरविण्यात येणार असल्याचे समजते.नागरिकांची गैरसोय:प्रशासनाने लक्ष द्यावेखारेपाटण येथे चेकपोस्ट असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच बाहेरून येणाºया नागरिकांना अडविले जाते. परंतु आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गावांना खारेपाटण बाजारपेठ ही एकमेव सोयीचे ठिकाण असून येथे दवाखाना, मेडिकल, बॅँकींग, जीवनावश्यक वस्तू आदींसाठी कणकवली, देवगड, वैभववाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गावातील नागरिक खारेपाटण येथे येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे या नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे.
परजिल्ह्यातून रेड झोन व हॉटस्पॉट परिसरातून येणारे प्रवासी खारेपाटण संभाजीनगर परिसरात दिवसभर थांबून राहत असल्यामुळे आमच्या स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी व्यक्त केले. ं