साटेली भेडशी : पिकुळे गावातील दारूबंदीसाठी चार दिवसांपूर्वी गावातील महिलांनी पोलिसांना निवेदन दिले होते. यावर नाममात्र किरकोळ कारवाई करायची म्हणून करण्यात आली. त्यानंतर दारू व्यावसायिकांनीच या महिलांना दमदाटी करून शिवीगाळ करत हिम्मत असेल, तर दारू बंद करून दाखवा, अशी धमकी दिली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक क्रांतीदल संघटनाध्यक्ष लवू रामा नाईक व महिलांच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा लक्ष्मण महालकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांची भेट घेऊन लक्ष वेधले. गावात खुलेआम राजरोसपणे दारूचे अड्डे सुरू आहेत. तरूण पिढीबरोबरच विवाहीत पुरूषही दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे कुटुंबांमध्ये कलह वाढला आहे. यासाठी गावातील मधलीवाडी येथील शेकडो महिलांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन दारू व्यवसाय बंद करा, अशी मागणी केली. याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी कारवाईचा सोपस्कार म्हणून एका दारू व्यावसायिकावर धाड टाकून एकच दारूची बाटली जप्त केली. त्यामुळे या कारवाईबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात आले होत. यामुळे हे व्यावसायिक जागृत होऊन आपला व्यवसाय आवरता घेतील अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. पण हे व्यावसायिक असे वावरत आहेत की त्यांना कुणा वरिष्ठाचे पाठबळ आहे. बेकायदेशीर दारूचा व्यवसाय बंद होणे गरजेचे असतानाही पोलिसांसह प्रशासनानेही याची गांभीर्याने दखल घेत संबंधित व्यावसायिकांवर वचक बसविणे गरजेचे होते. पण तसे न होता, ज्या महिलांनी निवेदन दिले, त्या महिलांना दारू व्यावसायिकांकडून शिवीगाळ करून धमकी देण्यापर्यंत मजल गेली. हिम्मत असेल, तर दारू विक्रीचा व्यवसाय बंद करून दाखवा, अशी धमकी या दारू व्यावसायिकांनी संबंधित महिलांना दिली आहे. त्यामुळे या महिलांच्यात संतापाची लाट उसळली असून या व्यावसायिकांना नेमके कुणाचे पाठबळ आहे, असा सवाल या महिलांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, या धमकीमुळे महिलांनी तातडीची बैठक घेऊन हा व्यवसाय कायमचा बंद क रण्यासाठी तीव्र लढा देणार असल्याचे दिक्षा महालकर यांनी सांगितले. शिवाय पिकुळे येथील युवक क्रांती दल संघटनेचे अध्यक्ष लवू नाईक यांनी देखील दारू व्यावसिकांना यापुढे गावात दारूची विक्री करून दाखवावी. महिलांना अशाप्रकारे दमदाटी केली जात असेल, तर संघटनेच्या माध्यमातून याविषयी जनआंदोलन करणार असल्याचे सांगितले. बुधवारी येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार यांची लवू नाईक व दिक्षा महालकर यांनी भेट घेत सर्व हकीकत कथन केली. याबाबत गावात जाऊन आढावा घेऊ व योग्य ती कारवाई करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)
व्यावसायिकांचे महिलांनाच आव्हान
By admin | Published: April 20, 2016 10:48 PM