कणकवली : स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात घनदाट जंगले होती. हिरवीगार वनश्री होती. खळाळणारे ओढे होते. तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या होत्या. सर्वत्र अप्रतिम निसर्गसौंदर्य होते; परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडात वृक्षांची वाढत्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. राज्यकर्ते व वनअधिकारी यांनी संगनमताने कोकणचे वाळवंट करण्याचा चंग बांधला आहे, अशी घणाघाती टीका सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची सभा वृक्षमित्र हॉलमध्ये आयोजित केली होती. त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी दौलतराव गोडसे, शांताराम नारकर, विश्वनाथ केरकर, बाबूराव आचरेकर, जगदीश दळवी, मनोहर पालयेकर, श्रृतिशया डोंगरे, डॉ. प्रा. पी. बी. पाटील, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर म्हणाले, वृक्षांची ही कत्तल थांबून कोकण सुजलाम् सुफलाम् रहावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वृक्षमित्र सेवा संघाची १९८८ साली रजिस्टर संघटना स्थापन केली. त्यावेळी माझ्यासोबत अण्णासाहेब चव्हाण, मिराताई जाधव, कमल विरनोडकर, अ. ना. कांबळी, प्रा. सुभाष गोवेकर, बाबा नाडकर्णी, आदी उपस्थित होते. वृक्षमित्र सेवा संघाने वृक्षतोडीविरुद्ध आवाज उठविल्याने वृक्षतोडीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. सामाजिक वनीकरणाचे कार्यक्षम अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्या सहकार्याने जिल्हाभर किसान व शालेय रोपवाटिकांची निर्मिती केली. वृक्षारोपण व संवर्धनावर भर देऊन त्याची समर्थ कार्यवाही केली. शासकीय शंभर टक्के अनुदानाचा लाभ घेऊन आंबा-काजूच्या बागा निर्माण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले. धडेवाटप करून स्वतंत्र सातबारा निर्माण करून शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानाचा लाभ घेता यावा म्हणून शासनावर दबाव आणला; पण या शासनाकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजही ५० टक्के शेतकरी १०० टक्के अनुदानापासून वंचित आहेत. ते म्हणाले की, वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता मातीसह नदीत वाहून जाते. त्यामुळे मुरलेले पाणी झऱ्याच्या रूपाने मिळत नाही. भरावामुळे नदीत कोंडीच्या भाटी झाल्या. दीडशे इंच पाऊस पडूनही अनेक भागात मार्च, एप्रिल, मे मध्ये प्यायला पाणी नसते. त्यासाठी धरणे बंधाऱ्याची सातत्याने मागणी करूनही ढिम्म शासन कार्यवाही करीत नाही. कोकणद्वेष्टे शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे लक्ष न देता ज्यांना खत पाण्याची गरज नाही असे कोकणात सर्वत्र आपण काजू व बांबू लावले, तर कोकणातून सोन्याचा धूर निघेल. अवैध वृक्षतोड व वाहतुकीला आळा बसावा म्हणून निर्माण केलेली बोगस चेकनाके बंद करून भ्रष्ट वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना तुरुंगात डांबावे. कोकणातून दररोज शेकडो ट्रक लाकूड कोकणाबाहेर जात असल्याने लाकूड वाहतुकीवर जिल्हा बंदी आणावी, वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी. यावेळी वृक्षमित्र विजय सावंत यांनी सागाची रोपे दिली. (प्रतिनिधी)
राज्यकर्त्यांचा कोकणचे वाळवंट करण्याचा चंग
By admin | Published: August 14, 2015 10:51 PM