दोडामार्ग : कोकणात एकमेकांना विरोध करण्याची वाईट प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात श्रीमंत जिल्हा बनवायचे असेल, तर एकमेकांना विरोध करण्याची भूमिका प्रथम बदलली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून सासोली येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी उदय चौधरी, राज्याच्या पर्यटक सचिव वलका नायर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सभापती विशाखा देसाई, उपसभापती आनंद रेडकर, सासोली सरपंच अनिरूध्द फाटक आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोकणचा विकास करण्याचे उध्दव ठाकरे यांचे स्वप्न आहे. कोकणसाठी आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पण कोकणच्या विकासात एकमेकांना विरोध करण्याची अपप्रवृत्ती आहे. एखाद्या विकासकामात विरोधाला विरोध केला जात असल्याने कोकण विकासाच्या बाबतीत मागे राहिले आहे. ही अपप्रवृत्ती प्रथम बंद केली पाहिजे. एकमेकांना विरोध करण्याची प्रवृत्ती जेव्हा मावळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि पर्यायाने कोकण समृध्द बनेल. शासनाची पर्यटन आणि कृषी क्षेत्राला भरघोस निधी देण्याची भूमिका राहील. असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)कोकणचा विकास : निधी कमी पडू देणार नाहीजिल्ह्यात काजू बागायतीसाठी सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करा, दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे. लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यापुढे हत्तींपासून शेती-बागायतीचे संरक्षण करण्याकरिता १० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी अनुदान तत्त्वावर खंदक खोदणे व सौरकुंपण घालण्याकरिता शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कोकणच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिली.मसुरे गावाला एक कोटीची मदतमेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या मसुरे गावाला १ कोटीचा निधी दिला आहे. एक कोटीच्या निधीत सावंतवाडीचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे मसुरे गावच्या विकासासाठी हा निधी मोठा असून, त्याचा गावच्या विकासासाठी योग्य वापर करा, अशी सूचनाही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी केली.
विकासासाठी विरोधाची भूमिका बदला
By admin | Published: July 01, 2016 11:25 PM