शिरगांव : देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या चाफेड गावठण येथील ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरास पुन्हा एकदा चाफेड ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतर विरोधी संघर्ष समिती व ग्रामस्थ यांनी कडाडून विरोध केला आहे. तात्पुरते स्थगित केलेले उपोषण २६ नोव्हेंबरपासून चाफेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्याचे जाहीर केले आहे.सन १९६६ साली चाफेड ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना झाली असून चाफेड गावठण येथील दानशूर व्यक्ती बाळा राणे यांनी स्वमालकीच्या गट क्रमांक ४८१ मधील जागा इमारतीसाठी विनामूल्य बक्षिसपत्राने दिली. त्या जागेवर गावठणमधील ग्रामस्थांनी श्रमदानाने इमारत बांधली. सध्या सुस्थितीत असलेल्या याच इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुस्थितीत असताना नवीन इमारत बांधणे म्हणजे शासनाच्या पैशाचा अपव्यय आहे. गावचे प्रमुख ग्रामदैवत श्री गांगेश्वर रासाई मंदिर, सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा, मतदान केंद्र, अंगणवाडी इमारत या प्रमुख बाबी गावठणमध्ये असताना केवळ आकसापोटी गावात तेढ निर्माण करण्यासाठी गावातील सरपंच व इतर काही ग्रामस्थांना हाताशी धरून ग्रामपंचायत कार्यालय अन्यत्र हलविण्याचे षड्यंत्र रचित आहेत, असे संघर्ष समिती व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.याबाबत १३ आॅगस्ट रोजी देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर संघर्ष समितीने ग्रामस्थांनी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले होते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी पत्रानुसार गटविकास अधिकारी देवगड यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत २६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय खासगी जागेत हलविण्याचा ठराव मांडण्यात आला. याला संघर्ष समितीने तीव्र विरोध करीत ग्रामपंचायत कार्यालयासमोरच २६ नोव्हेंबर रोजी सकाळी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत निवेदनाच्या प्रती पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, देवगड पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)निर्णय अयोग्य : लोकशाही मार्गाने आंदोलन भोगलेवाडी, पिंपळवाडी व बादेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे अंतर लांबीचे पडत असल्यामुळे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी पिंपळवाडी फाट्यावर कार्यालय व्हावे अशी मागणी केली. ३० जून रोजीच्या ग्रामसभेत कार्यालय स्थलांतराचा ठराव मंजूर करण्यात आला. या तीन वाड्या वगळता उर्वरीत वाड्यांनी स्थलांतरास विरोध दर्शविला आहे. संघर्ष समिती व उर्वरित ग्रामस्थांनी गावात तंटा व मतभेद नको म्हणून ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरीत करायचे असेल तर गावठणवाडी फाट्यानजीक नवीन इमारत व पायाभूत सुविधा निर्माण करून करण्यात यावे असा सुवर्णमध्य काढण्यात आला होता. असे असताना सरपंचांनी २६ नोव्हेंबर रोजी पोलीस संरक्षणात खासगी जागेत कार्यालय स्थलांतर करण्याचा केलेला ठराव योग्य नाही. आम्ही याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार आहोत. कार्यालय स्थलांतरापेक्षा गावात स्वतंत्र पोस्ट आॅफिस, तलाठी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, स्वतंत्र वायरमन अशा सुविधांचा अभाव आहे. सरपंचांनी प्रथम यासाठी पाठपुरावा करावा, असे चाफेड ग्रामपंचायत स्थलांतर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच आकाश राणे यांनी सांगितले.
चाफेड ग्रा.पं.कार्यालय स्थलांतरास पुन्हा विरोध
By admin | Published: November 23, 2015 11:35 PM