सिंधुदुर्गनगरी 28 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाºया लाभार्थ्यांच्या यादीचा संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी चावडी वाचन करण्याचे आदेश तहसीलदार स्तरावरून देण्यात आल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी दिली.
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या आॅनलाईन नोंदणीमधून शासनाने ३६ हजार कर्जदार शेतकºयांची निश्चिती केली आहे.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरणाºया कर्जदार लाभार्थ्यांच्या याद्यांचे ग्रामसभांमध्ये चावडी वाचन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यात कोणत्या कुटुंबातील शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यात किती शेतकरी आहेत? कोणाच्या नावावर कर्ज आहे? तो आयकर भरतो का? कर्ज माफी होणारी व्यक्ती शासकीय सेवेत आहे का? याबाबतची माहिती ग्रामसभेत दिली जाणार आहे.
यावेळी कोणाचा आक्षेप असल्यास तो यावेळी नमूद करून घेण्यात येणार आहे. तसा शेरा संबंधित शेतकºयांच्या नावासमोर मारण्याच्या सूचना तालुका समितीने चावडी वाचन करणाºया कर्मचाºयांना दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ग्रामसभांमध्ये चावडी वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा सहकार उपनिबंधक विभागाने केले आहे. त्यामुळे या चावडी वाचन कार्यक्रमाला शेतकºयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी केले आहे.