कणकवली: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. मात्र, आता या योजनेत कमीत कमी लोकांना ठेवण्याचे धोरण सरकारचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार ६५५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे त्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, मोदी @९ या अभियानांतर्गत भाजपाचे कार्यकर्ते जनतेमध्ये जात आहेत. त्यावेळी ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान योजनेचा गाजावाजा केला जातो, तशी सत्य परिस्थिती नाही. यामध्ये जनतेची कशी फसवणूक झाली आहे, हे देखील लोकांना आता सांगण्याची आवश्यकता आहे. या योजनेतील जिल्ह्यातील ३८ हजार ६५५ शेतकरी अपात्र ठरले आहेत, त्यांच्या बँक खात्यातून थेट वसुली केली जात आहे. पॉवर ट्रीलर किंवा कर्ज घेताना पॅनकार्ड, आधारकार्ड द्यावे लागते. त्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण सुरू असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला.या योजनेबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दुटप्पी भूमिका घेत आहेत. काही दिवसांपूर्वी परराज्यातील बोगस लाभार्थी मिळाले असताना त्यांचा अहवाल परजिल्ह्यातील लाभार्थी असा करत अजूनही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. याबाबत आपण विधानसभा अधिवेशनात आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करत आवाज उठविणार आहोत.
एसटीचे दीड कोटी रुपये थकीत!'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमासाठी लोकांना आणण्यासाठी जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील एसटी बस मागविण्यात आल्या होत्या. शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला. लोकांना जबरदस्ती कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. एसटी महामंडळाचे दीड कोटी रुपये अजूनही जमा केले नाहीत. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने एसटी महामंडळाची देय रक्कम द्यावी. अशी मागणीही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केली.