सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेसोबतची कटुता संपविण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला स्वागतार्ह आहे. पण कटुता निर्माण होण्यामागे राणे यांची वक्तव्ये तपासली गेली पाहिजेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या भाषेत त्यांनी टीका केली त्यावरून कटुता कशी संपेल? असा सवाल राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना शिवसेनेसोबतची कटुता संपविण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे, पंतप्रधान मोदी यांचे खालच्या स्तरावर जाऊन व्यंगचित्र काढणे याला कोणती नैतिकता म्हणता येईल? असा सवालही मंत्री केसरकर यांनी केला.
मुख्यमंत्री कणकवलीत येणार असून, ते सावंतवाडीत आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मी त्यांच्या हाताखाली काम केले आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.