सिंधुदुर्ग : राज्य सरकारकडून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांच्या आग्रही मागणीनंतर आरोग्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दहा जिल्ह्यांमध्ये कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही, याकडे आमदार अॅड. डावखरे यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो.
त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली होती. त्यावर लवकरच सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याची ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी दिली.