रत्नागिरी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत शासनाकडून मंजुरी मिळालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा आरंभ १५ आॅक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होेणार आहे. ६२ कोटी ९ हजार २६२ रुपये खर्चाची ही योजना आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज (शुक्रवारी) ही माहिती दिली.भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, अन्य पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. २०११च्या नगरपरिषद निवडणुकीत सेना-भाजप युतीतर्फे जनतेला पाणीपुरवठा योजना आणण्याबाबत शब्द देण्यात आला होता. सेनेचे मिलिंद कीर यांनी नगराध्यक्ष असताना शहर विकास आराखड्याला चालना दिली. भाजपचे त्यानंतरचे नगराध्यक्ष अशोक मयेकर व विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी या योजनेचा पाठपुरावा केला, असेही माने म्हणाले. १५ आॅक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीस हे नाणीजला कार्यक्रमासाठी येणार आहेत. याच दौऱ्यात रत्नागिरीच्या या पाणी पुरवठा प्रकल्पाचा आरंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. येत्या चार ते पाच दिवसात या योजनेची प्रक्रिया सुरू होईल व लवकरात लवकर ही योजना पूर्ण केली जाईल. ही योजना केवळ कागदावर नाही तर आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. रत्नागिरीकरांची पाणी समस्या सोडविण्याबाबत गेल्या काही वर्षात केवळ घोषणा झाल्या. कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. मात्र, तत्कालिन सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडविता आला नाही. १७ जानेवारी २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे पेजे न्यासाच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी या योजनेची मागणी केली होती. त्यांनी योजना मंजूर करण्याचा शब्द दिला होता. प्रकल्प मंजुरीमुळे तो शब्द पूर्ण झाला आहे, असे माने म्हणाले. येत्या दिवाळीपर्यंत रत्नागिरी शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल. मारुती मंदिर, माळनाका व अन्य भागातही योग्य दाबाने नळ जोडण्यांना पाणी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील सांडपाणी वहन यंत्रणा अयोग्य असल्याने भुयारी गटार योजनेच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल. ही योजनाही २०१७मध्ये पूर्ण होईल. पाणी योजनेच्या मंजुरीअभावी भुयारी गटार योजनेचे काम रखडले होते. आता हे काम पूर्ण होईल. रत्नागिरी शहरात वायफाय सेवा सुरू करण्याचा विचार आहे. शहरातील रस्तेही सिमेंट कॉँक्रीटचे केले जातील. येत्या तीन वर्षात रत्नागिरी हे देशातील ‘स्मार्ट शहर’ बनविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व अन्य विकासकामांसाठी ११० कोटी खर्चाचा ग्रामीण विकास आराखडा तयार आहे. जिल्हा परिषदेतर्फे ही कामे केली जाणार आहेत. पूर्वीच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या काळात विकासकामे ठप्प झाली होती. काही ठराविक लोकांनाच कामाच्या निविदा दिल्या जात होत्या. ठराविक ठेकेदारांकडून दुसऱ्या ठेकेदारांना निविदा भरू नका, अशी दादागिरी व्हायची. आता राज्यातील सत्ता बदलली आहे. रत्नागिरीतील ठेकेदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, दादागिरी संपली आहे, त्यामुळे विकासकामेही लवकर होतील, असे माने म्हणाले. नगर परिषदेसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी जे अर्ज येतील, ती यादी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविली जाईल. दानवे हेच अंतिम नाव निश्चित करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)८ रोजी चिपळुणात बैठकनगरसेवकपदाची उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबतचा निर्णय भाजपची जिल्हा निवडणूक समिती घेणार आहे. या समितीमध्ये माजी आमदार विनय नातू, माजी आमदार राजन तेली, नाना शिंदे यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे. ८ आॅक्टोबरला चिपळूणमध्ये या समितीची बैठक होत आहे.अशोक मयेकर गैरहजररत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर हे पत्रकारपरिषदेला अनुपस्थित होते. याबाबत विचारता अशोक मयेकर पावस किंवा मिरजोळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत ते नगराध्यक्षपद उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचे बाळ माने यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. मात्र, अशोक मयेकर हे नगराध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
पाणी योजना शुभारंभासाठी मुख्यमंत्री १५ला रत्नागिरीत
By admin | Published: October 07, 2016 10:26 PM