सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : 'शासन आपल्या दारी' या योजनेचा मोठा कार्यक्रम आज कोकणात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून शिंदेंनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी सावंतवाडीसाठी ११० कोटींच्या निधीची मोठी घोषणा केली. तसेच या आधी एवढा निधी कधीच आला नसल्याचं सांगितलं. शासन आपल्या दारी या योजनेचा चौथा कार्यक्रम आज सिंधुदुर्गात पार पडला.
कोकणासाठी जे काही करता येईल ते केलं जाईल, महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत काल तीन तास बैठक झाली, असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि त्यांचं आभार देखील मानले. "केंद्रीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देऊ. मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आपल्या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत ही मोठी बाब आहे. मागील सरकारनं जे काही प्रकल्प थांबवले होते ते मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले", असंही शिंदेंनी सांगितलं.
मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार - शिंदे
तसेच आम्ही केंद्रांकडे पाठवलेल्या प्रस्तावाला लगेच मान्यता दिली जाते, केंद्राकडे मागितलेली १०० टक्के रक्कम लगेच मिळते, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव दिले जाईल. पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार आहे, कारण वेगवान विकासात मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधिक सांगितले.
चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नावदरम्यान, राज्यातील खेळाडूंना वाव देण्यासाठी तीन क्रीडा संकुल बांधली जातील, अशी ग्वाही शिंदेंनी दिली. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्या नावानं ड्रेसिंग रूम बांधलं जात आहे. याशिवाय चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा देखील शिंदेंनी सावंतवाडीतून केली.