सावंतवाडी : सावंतवाडी-वेंगुर्ले नगरपालिकेसाठी स्थानिक पातळीवर भाजपने युतीचे दोर कापले असतानाच गुरुवारी सकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी युतीला सहमती दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी-वेंगुर्ले नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मालवण व देवगड नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती झाली. मात्र, सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती झाली नसल्याने भाजपने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आता आम्ही काही झाले तरी उमेदवारी मागे घेणार नसून, आम्हाला युती नको, असा पवित्रा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी तर शिवसेना युतीचा प्रस्ताव घेऊन आली तरीही युती करणार नाही. तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होणार, असे सांगत युती वरिष्ठ पातळीवरून होत असते, असे सांगितले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. त्यातच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, या भेटीत सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसची ताकद कशी आहे. शिवसेना-भाजप एकत्र आल्यास त्याचा आम्ही कसा सामना करू, हे सांगितले. तसेच दोडामार्ग व कुडाळमध्ये युती न झाल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे सावंतवाडी व वेंगुर्ले येथे युती करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्याना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली : दीपक केसरकर पालकमंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, युतीबाबत तेच काय ते सांगतील, असे सांगितले.
भाजपशी युतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
By admin | Published: November 03, 2016 11:22 PM