वैभव साळकर-- दोडामार्ग -नव्याने स्थापन झालेल्या कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा पदभार स्वीकारून नव्या पदाधिकाऱ्यांना दोन महिने उलटल्यानंतर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रामदास कोकरे यांची बुधवारी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, नगरपंचायत झाली, निवडणूकही झाली अन् आता मुख्याधिकारीही नेमण्यात आले. पण विकासकामांच्या निधीचा मात्र अजूनही पत्ता नाही. तर नगराध्यक्ष, विषय समिती सभापती व नगरसेवकांना अद्यापही आपले अधिकारी मिळालेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत दोडामार्गच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सर्वच नेत्यांचे पितळ उघडे पडले असून, त्यांच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. त्यामुळे कसई-दोडामार्गच्या विकासाचा कारभार हाकताना लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.तालुक्याच्या ठिकाणांचा विकास जलदगतीने व्हावा, सर्व सुखसुविधा मिळाव्यात आणि शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगती व्हावी, या हेतूने तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने राज्यातील प्रत्येक तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी युती शासनाने केली आणि त्याचाच परिणाम म्हणून कसई-दोडामार्गच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले. या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांकडे पदभार देखील देण्यात आला. मात्र, तब्बल दोन महिने उलटले, तरी नगरपंचायतीचा कारभार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे पद मिळाले पण अधिकारांचे काय? असा पेच येथील पदाधिकाऱ्यांना पडला होता. दरम्यान, दोडामार्गचे नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी तर प्रशासनाच्या या गैरप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत अधिकारी नियुक्त करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पण प्रशासनाने त्याचे दखल न घेतल्याने सर्व विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक यांच्यासह उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर प्रशासनात तत्काळ निर्णय घेत मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेंगुर्लेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दोडामार्गचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून बुधवारी नेमले. दरम्यानच्या काळात केवळ दाखले देण्यापलीकडे नव्या पदाधिकाऱ्यांना अधिकार मिळालेले नव्हते. त्यामुळे शहरातील विकासकामे मात्र ठप्पच आहेत. वास्तविक नव्याने नगरपंचायत झाल्यानंतर त्या नगरपंचायतीचा कारभार हाकण्यासाठी आवश्यक तो कर्मचारीवर्ग, मुख्याधिकारी आणि कार्यालय चालविण्यासाठी चांगल्या इमारतीची गरज असते. ही सोय प्रशासनाने नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. निदान निवडणूक पार पडल्यानंतर तरी प्रशासनाने ही कारवाई शीघ्रगतीने करणे अपेक्षित असताना दुर्दैवाने तसे न झाल्याने शहराचा विकास ठप्पच आहे.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा कारभार सध्या अगोदरच्या ग्रामपंचायतीच्या छोट्या खोलीतच सुरू आहे. कर्मचारीदेखील पूर्वीचे ग्रामपंचायतीचेच आहेत. प्रशासकाकडून सध्या कारभार सुरू आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि विषय समिती सभापती निवडण्यात आले. दोन मासिक बैठकादेखील पार पडल्या. पण मुख्याधिकाऱ्यांशिवाय झालेल्या या बैठकीत केवळ चर्चा करण्यापलिकडे काहीच झाले नाही. शिवाय कार्यालयासाठी नवीन इमारतीची पर्यायी सोयही झालेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयातच घिसडघाईने मासिक बैठक घ्यावी लागते. नगरपंचायतीचे एकूण १७ नगरसेवक आहेत. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही जागेअभावी मासिक बैठकीवेळी गैरसोयींना सामोरे जावे लागते. कोणत्याही प्रकारच्या निधीचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे लोकांना निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पाळणार तरी कशी? असा यक्ष प्रश्न नवनिर्वाचित नगरसेवकांना पडला आहे.पदभार स्वीकारला बुधवारी संध्याकाळी वेंगुर्लेचे मुख्याध्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कसई- दोडामार्ग नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्ष संतोष नानचे, सेनेचे गटनेते संतोष म्हावळंकर, भाजपचे गटनेते चेतन चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी राजेश प्रसादी, सुधीर पनवेलकर आदी नगरसेवक उपस्थित होते.दोडामार्ग नगरपंचायत : निधी मिळणार तरी कधी?निवडणूक होऊन दोन महिने पूर्ण झाले, तरी अद्याप शहरातील एकाही प्रभागात विकासकाम सुरू न झाल्याने नागरिकांकडून आपापल्या प्रभागाच्या नगरसेवकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गटार बांधणी, रस्ते आदी समस्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. परिणामी शहराचा विकासच ठप्प झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. नव्या नगरसेवकांची जुन्या कार्यालयात बैठक
मुख्याधिकारी मिळाले; निधीचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 10:58 PM