सिद्धेश आचरेकर - मालवण -भाविकांचा अभूतपूर्व उत्साह- आनंद... सडा-रांगोळीची आरासङ्घ. फटाक्यांची आतषबाजी अन् ढोल-ताशाचा गजर... भाविक-भक्तांकडून झालेली पुष्पवृष्टी तसेच विद्युत रोषणाईने गजबजलेली ऐतिहासिक मालवण बाजारपेठङ्घ... हजारो भाविकांच्या उपस्थित अवर्णनीय आणि अविस्मरणीय असा शिवकालीन महत्त्व असलेला ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.प्रत्येक मालवणकर जणू देवतांच्या भेटीने भक्तीरसात चिंब न्हाऊन गेल्याचे प्रसन्न वातावरण गुरुवारी रात्री उशिरापर्यंत होते. मालवणच्या प्रमुख उत्सव असलेला पालखी उत्सव व मंदिरातील देवींचा पारंपरिक भाऊबीज सोहळ्यानिमित्त यावर्षी बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. मालवणातील श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यास गुरुवारी दुपारी २ वाजता सुरुवात झाली. गावकर, मानकऱ्यांनी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घातले. ढोल-ताशांच्या गजरात पालखी खांद्यावर घेवून भाविक मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडले. देवतांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखी आडवण येथील श्री देवी सातेरीची भेट घेऊन पुढे वायरी भूतनाथ येथे श्री देव भूतनाथ देवालयामध्ये आल्यावर रामेश्वर नारायण देवतांची पालखी भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली.यावेळी पालखी सोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे-गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात आले. भूतनाथ मंदिर येथे गाऱ्हाणे, देवतांचे दर्शन व देव भेटीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर देवतांची पालखी समुद्रीमार्गे मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर येथे आली. दांडेश्वर मंदिर, श्री देवी काळबाई मंदिर, जोशी मांड येथे बहिण-भावांची भेट घेत पालखी बाजारपेठ रामेश्वर मांड येथे ८.३० ते १० वाजेपर्यंत दर्शनासाठी थांबली होती. त्यानंतर रात्री बाजारपेठ, भरड, देऊळवाडामार्गे पुन्हा पालखी मंदिरात पोहोचली. रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओढा कमी झाला नव्हता. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी पालखीचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष अशोक तोडणकर, व्यापारी संघाचे उमेश नेरुरकर, शिवसेनेचे बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, स्नेहा आचरेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संजय लुडबे, हॉटेल बांबूचे संजय गावडे, नितीन तायशेटे, नानाशेठ पारकर, विजू केनवडेकर तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, यासह गावकर-मानकरी भाविक सहभागी होते.
मालवणनगरी भक्तीरसात चिंब
By admin | Published: November 13, 2015 10:55 PM