सिंधुदुर्गनगरी : चिपी विमानतळाला आवश्यक सर्व पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घ्या येत्या 1 मे पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.चिपी विमानतळासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चिपी विमानतळ येथे आज आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, पालक सचिव वल्सा नायर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अशिषकुमार सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अश्विनी कुमार, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, आय.आर.बीचे राजेश लोणकर, किरण कुमार, सुधिर होशिंग आदी उपस्थित होते.चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक प्राधान्यांने सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन आपापली कामे प्राधान्याने करावी अशी सुचना करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विमानतळावर राज्य शासनाच्यावतीने करावयाच्या सर्व उपाययोजना प्राधान्याने हाती घ्या.
यामध्ये नियमीत विद्युत पुरवठा, एमआयडीसी कडील जमीनीचे हस्तांतरण, स्ट्रीट लाईटचे काम, सात मीटरचा रस्ता, पाणी पुरवठा या सर्व कामांचा कृती आराखडा तयार करून ही कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. याबरोबरच आयआरबीने टर्मिनलचे काम 15 एप्रिलपर्यंत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.प्रारंभी पालक सचिव वल्सा नायर यांनी चिपी विमानतळावर सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती सांगितली. तसेच कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिपी विमानतळाची पाहणी केली. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.