आचरा : चिंदर-भटवाडीत भरवस्तीत जखमी अवस्थेतील बिबट्या शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घुसला. भरवस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. मात्र, तब्बल सहा तासांनी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अखेर दुपारी २.३० च्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला पुढील उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. येथील रहिवासी राजू वराडकर यांंच्या घरामागे हा बिबट्या घुसल्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी धाव घेत बिबट्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिथरलेल्या बिबट्याने विलास कांबळीच्या बागेत आश्रय घेतला. इतरत्र बिबट्याने पलायन करू नये म्हणून शेकडो ग्रामस्थांनीच यावेळी पहारा दिला. सकाळच्या सुमारास चिंदर भटवाडीत आलेला बिबट्या भर वस्तीत घुसू नये म्हणून शेखर पालकर, विश्वनाथ दळवी, संजय हडप्पी, दिवाकर कावले, जितेंद्र वराडकर, भाई पारकर व अन्य ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करीत बिबट्याला आठ तास रोखून धरले होते. उशिराने वन विभागाचे अधिकारी विलास मुळे, वनरक्षक किशोर परुळेकर, अनिल राठोड, तानाजी दळवी हे दाखल झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. (वार्ताहर) सिंधुदुर्ग वनविभागाकडे एकच पिंजरा दिवसेंदिवस भर वस्तीत जंगली प्राणी घुसण्याची संख्या वाढत असतानाही वनविभाग सिंधुुदुर्ग यांच्याकडे मात्र एकच पिंजरा असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी वनअधिकारी मुळे दाखल झाले; परंतु त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्याचा पिंजरा नसल्याने माणगाव-आंबेरी येथून पिंजरा मागविण्यास चार तासांचा कालावधी गेल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले. जखमी बिबट्याला उपचारांची गरज वस्तीत आढळून आलेल्या बिबट्याला प्रथमदर्शनी इजा झाल्याचे दिसून येत होते. त्याला डोळ्यांनी दिसत नसल्याने तो पूर्णपणे भेदरलेल्या स्थितीत होता. त्यामुळे बिबट्याच्या हालचाली मंदावलेल्या दिसत होत्या. जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाचा कोणताही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. याबाबत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारले असता, कुडाळ येथे नेऊन उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चिंदर-भटवाडीत जखमी बिबट्या घुसला
By admin | Published: January 23, 2016 11:42 PM