ओरोस : वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरकडून जिल्हा परिषद कार्यालयाला वीज पुरवठा करणार्या केबल नादुरुस्त झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा भवनामध्ये वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे. वैतागलेल्या कर्मचार्यांनी अखेर बांधकाम विभागाच्या वीज पुरवठा कंपनीच्या अधिकार्यांना बुधवारी घेराओ घालत धारेवर धरले. त्यानंतर दिवसभर केबल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. सायंकाळी उशिरा किंवा गुरुवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले. जिल्हा परिषद कार्यालयाला वीजपुरवठा होण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरपासून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत वीज केबल टाकलेल्या आहेत. या केबल्स आता जुन्या झालेल्या असून २० वर्षे झाल्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होऊन जिल्हा परिषदेचा वीज पुरवठा खंडित होत आहे. जिल्हा परिषद भवनामध्ये प्रशासकीय कामकाजासाठी वाढलेल्या जादा चारशेहून जास्त संगणकांचा वापर, प्रत्येक पदाधिकारी व अधिकार्यांकडील वातानुकूलित यंत्राचा वापर यामुळे विद्युतभारही वाढत आहे. अशा परिस्थितीमुळे वीज केबलही नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तीन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. त्यातच उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे कर्मचारी, अधिकारीवर्ग घामाने हैराण झाले आहेत. पंख्याशिवाय बसणेही कठीण झाले आहे. विविध विभागाचे कर्मचारी एकत्रित येत जिल्हा परिषदेमधील वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना घेराओ घालत धारेवर धरले. त्यानंतर वीज केबल दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते. बांधकाम विभागाचा नाईलाज वीज केबल दुरुस्त करणे म्हणजे बांधकाम विभागाला अवघड जागेचे दुखणे झाले आहे. कारण केबल दुरुस्त करूनही पुन्हा पुन्हा नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे त्या बदलल्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्या बदलण्यास जिल्हा परिषद प्रशासन हालचाल करत नाही. आर्थिक तरतूद केली जात नाही. मुळातच यापूर्वी केबल दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाची ६५ हजारांची रक्कम अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेली नाही. मात्र, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी केबल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यामुळे सायंकाळी किंवा गुरुवारी काम पूर्ण होणार आहे. (वार्ताहर)
वीज अधिकार्यांना घेराओ
By admin | Published: May 29, 2014 12:39 AM