सावंतवाडी : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांचे मुदत संपलेल्या पॉलिसीचे पैसे न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी बुधवारी सावंतवाडी शाखेचे ब्रँच मॅनेजर मनोज मणेरकर यांना घेराव घातला. ठेवींचे पैसे का देत नाहीत असा जाब विचारत मणेरकर यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी सोळा दिवसात ही रक्कम देण्याचे आश्वासन दिले, तर दोन दिवसांत पॉलिसी संपलेल्या ग्राहकांनी संचयनी येथील शिवसेना शाखेत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले. यावेळी ग्राहक संदीप मणेरकर, संतोष मणेरकर, संजना मणेरकर, शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख राकेश नेवगी, राजू शेटकर, हेमंत केसरकर, अजित सांगेलकर, राजू कासकर, विक्रांत नेवगी, अनिल भिसे, आदी उपस्थित होते.पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी गेली सात-आठ वर्षे शिरशिंगे येथील एजंट अजित राऊळ याने विविध गावातील लोकांच्या पॉलिसी काढल्या होत्या. या पॉलिसीची मुदत संपून सहा महिने उलटले, तरी पैसे मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले होते. याबाबत राऊळ याला जाब विचारताच तो विविध आश्वासने देऊन टाळाटाळ करत असे. राऊळ याला संबंधित ग्राहकांनी सावंतवाडीतील तारा हॉटेल येथे पकडले व आमचे पैसे कधी मिळणार, याबाबत विचारणा केली. यावर त्या एजंटने मी काम सोडले, असे सांगितले. यावेळी संतप्त ग्राहकांनी तत्काळ एजंटला धारेवर धरले. तू आमच्या कष्टाचे पैसे नेलेस, ते तूच परत कर, असा पवित्रा घेत भर रस्त्यातच त्याला घेराव घातला. यावेळी त्याने उलटसुलट उत्तरे देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.ठेवीदारांत खळबळया कंपनीत पैसे गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा मोठा कल आहे. ही रक्कम कोट्यवधी आहे. या प्रकाराने ठेवीदारांत खळबळ माजली आहे. पैसे तत्काळ मिळावेत यासाठी ठेवीदार एजंटांशी संपर्क साधत आहेत.
सावंतवाडीतील पॅनकार्ड क्लब कार्यालयाला घेराव
By admin | Published: August 19, 2015 11:30 PM