कणकवली : एस. टी. कामगारांच्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही, असा आरोप करीत इंटकच्यावतीने सोमवारी कणकवली एस.टी. आगार व्यवस्थापक एस. डी. भोकरे यांना घेराव घालण्यात आला. तसेच जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्राही घेण्यात आला होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. इंटकच्यावतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. तसेच २१ फेब्रुवारीपर्यंत समस्यांचे निराकरण न केल्यास २२ फेब्रुवारीला घेराव घालणार असल्याचे त्यात नमूद केले होते. मात्र, या समस्या न सुटल्याने सोमवारी घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे, विभागीय सचिव एच. बी. रावराणे, कार्याध्यक्ष कृष्णा राणे, संजय सावंत, गणेश शिरकर, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तर एस. टी. प्रशासनाने पोलिसांना पाचारण केल्याने पोलीस निरीक्षक सुनील मोरे हे पथकासह दाखल झाले. यावेळी विविध प्रश्न उपस्थित करून आगार व्यवस्थापकांना धारेवर धरण्यात आले. आगाराचे झालेले नुकसान व चुकीच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा त्रास याबाबत पत्राद्वारे वेळोवेळी आपल्याला सूचना केलेली आहे. विभाग नियंत्रकांच्या सूचनेनुसार पत्रात नमूद केलेल्या कामगारांच्या प्रश्नांबाबत इंटकच्या विभागीय पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी २५ जानेवारीला चर्चा केली होती. त्यावेळी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आपण देऊनही अद्याप त्या का सोडविल्या नाहीत ?, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. (वार्ताहर) लेखी निर्णय नाही आमच्या प्रलंबित प्रश्नांकडे का लक्ष दिले जात नाही? यापुढे तरी तत्काळ लक्ष देऊन संबधित अधिकारी व आगाराचे तसेच एस.टी.च्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच आमच्या १0 प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्यावर तत्काळ लेखी निर्णय द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, आगार व्यवस्थापकांनी लेखी निर्णय देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.
आगार व्यवस्थापकांना घेराव
By admin | Published: February 23, 2016 11:55 PM