कणकवली : कणकवली शहरात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे. रविवारी आठव्या दिवशी सर्वच बाजारपेठ, रिक्षा व्यवसाय, बेकरी तसेच अन्य व्यवहारसुद्धा पूर्णत: बंद होते. जनता कर्फ्यूचा निर्णय कणकवली नगरपंचायत, व्यापारी आणि विविध संस्थांनी घेतल्यानंतर त्याचे काटेकोर पालन करण्यात आले. यातून एकजूट दाखवित घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याचा आदर्श कणकवलीवासीयांनी इतर जिल्हावासीयांसमोर ठेवला आहे.दरम्यान, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत.कणकवली शहरात २० ते २७ सप्टेंबर या आठ दिवसांत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या काळात औषध दुकाने वगळता सर्वच व्यवसाय बंद होते.
या जनता कर्फ्यूत नागरिकांनी स्वत:हून सहभाग घेतला होता. त्यामुळे कणकवलीबरोबरच परिसरातील कलमठ, वरवडे, जानवली, वागदे, ओसरगाव, तळेरे अशा गावांमध्ये सुद्धा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. कणकवली शहराप्रमाणेच तालुक्यातील बहुतांश गावात जनता कर्फ्यू असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मोठे सहकार्य मिळाले आहे.
कणकवली तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने समूह संसर्ग कमी होण्यासाठी जनता कर्फ्यू गरजेचा होता. त्यामुळे कर्फ्यू घोषित केल्यावर नागरिकांनीही त्याला पाठिंबा दर्शवित घरात बसणे पसंत केले. त्यामुळे हा जनता कर्फ्यू यशस्वी झाला आहे.