- वैभव साळकर दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करून दाखविण्याचे ध्येय समोर असले की अनंत अडचणी वाटेत आल्या तरी त्यावर मात करीत यश मिळविण्याचा आनंद काही औरच असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे कोनाळकट्टा येथील क्लारा फर्नांडिस. घरची परिस्थिती बिकट, निवाऱ्यासाठी झोपडीवजा घर, घरात वीजेची सोय नाही. अशा ना ना अडचणी असूनही क्लाराने दिव्याचा अंधुक प्रकाशावर अभ्यास करून दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून ७८.४६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.तिला भविष्यात ‘परिचारिका’ (नर्स) बनून रूग्णसेवा करायची आहे. तिमिराहूनी तेजाकडे जाण्याचा तिचा प्रयत्न आहे. मात्र अव्वल यश मिळवूनही केवल परिस्थितीमुळे भविष्याची चिंता तिच्यासमोर उभी ठाकली आहे. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी दानशुरांच्या मदतीचा हात पुढे येण्याची गरज आहे.कोनाळकट्टा येथील क्लारा फर्नांडिस ही एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टाची विद्यार्थीनी. दहावी पर्यंतचे शिक्षण तिने येथेच पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची, आई, वडिल मोलमजुरी करून संसाराचा गाढा हाकतात. शिवाय क्लारा बरोबरच तिच्या इतर तीन बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेण्यात क्लाराला अडचणी आल्या. मात्र, सामाजिक कार्यकर्ते संजय सातार्डेकर आणि तिचे शिक्षक अरूण गवस यांनी मदतीचा हात पुढे केल्याने तिने दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविला.सातार्डेकर यांनी तिच्या एसटी बसच्या पासचा खर्च उचलला. तर गवस यांनी शाळेसाठी येणारा इतर खर्च दिला. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे क्लाराचे स्वप्न पूर्ण झाले. घरात वीजेची सोय नसल्याने रॉकेलच्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात रात्री जागवून अभ्यास केला. आणि दोडामार्ग कनिष्ठ महाविद्यालयात अव्वल येण्याचा मानही मिळविला. तिला परिचारिका बनून रूग्णांची सेवा करावयाची इच्छा आहे. उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिला नक्कीच आहे. मात्र त्याचबरोबर भविष्यातील शिक्षणाची चिंता देखील तिला आता सतावत आहे. उज्ज्वल गुणवत्ता असून सुद्धा आपले स्वप्न पूर्ण होईल की नाही याचा प्रश्न तिच्यासमोर आहे. परिणामी क्लाराच्या या स्वप्नांना पंख देण्यासाठी समाजातील दानशुरांच्या मदतीची तिला गरज आहे.
दिव्याच्या प्रकाशात क्लाराची उंच भरारी, बारावी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळविला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 2:47 PM