कणकवली : कणकवली तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभेमध्ये आज, सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन गटातील शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमध्ये एका गटाचे चार तर दुसऱ्या गटाचे तीन असे सातजण जखमी झाले आहेत. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नाटळ ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ग्रामसभेत दोन गटांमध्ये काही कारणांवरून शब्दीक बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटाच्या सदस्यांनी एकमेकांवर खुर्चा फेकून मारल्या तर काही जणांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. या राड्यात एका गटाचे ४ तर दुसऱ्या गटाचे ३ सदस्य जखमी झाले आहेत. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उद्धवसेनेचे कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह शिवसैनिक तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत,स्वप्नील चिंदरकर यांच्यासह कार्यकर्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत जखमींकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक समशेर तडवी, उपनिरीक्षक सागर शिंदे,हवालदार मंगेश बावदाने,राज आघाव,विनोद चव्हाण आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही गटाच्या सदस्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली होती.
Sindhudurg: नाटळ येथील ग्रामसभेत हाणामारी; दोन गटातील सात जण जखमी
By सुधीर राणे | Published: June 03, 2024 4:44 PM