कणकवली : स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक बांधिलकी राखत असलदे विभागात २०० हून अधिक श्रीसेवकांनी स्वच्छता केली. या मोहिमेत परिसरातील १५ टनापेक्षा जास्त कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. असलदे, बेळणे, नांदगाव या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. असलदे गावात रविवारी सकाळीच श्रीसेवकांनी स्वच्छतेला सुरूवात केली. यावेळी सरपंच संध्या परब, उपसरपंच पंढरी वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य लीलावती तेली, माजी सरपंच अंकुश परब, रामचंद्र लोके यांच्यासह श्रीसेवक सहभागी झाले होते. असलदे उगवतीवाडी गणेशमंदिर, मधलीवाडी प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, गावठणवाडी प्राथमिक शाळा, शिवाजीनगर प्राथमिक शाळा, बौध्दवाही समाज मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. बेळणे गावातही सहा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. १ फेबु्रवारी रोजी नांदगावातील सार्वजनिक ठिकाणांची व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली होती. तीनही गावांतून १५ टनांहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
असलदे, बेळणे, नांदगाव येथे स्वच्छता मोहीम
By admin | Published: February 15, 2015 10:37 PM