कणकवली : तालुक्यातील कसवण गावात मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असल्याने पाणी टँचाई बरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गावातील काळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्यात. अशी मागणी कसवण- तळवडे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांपासून कसवण गावात पाणी टँचाई हा विषय तीव्र झाला असून भूजल साठा संवर्धनासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. परंतु गावात होत असलेल्या गौण खनिज उत्खननामुळे या प्रयत्नांना अद्यापही यश मिळालेले नाही.दिवसेंदिवस भूजल पातळी खालावलेली आहे. याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली आहे. तसेच या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी तत्काळ बंद व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून खाणी बंद करण्यात याव्यात.कसवण गावात उंच सखल भूभाग असून सखल भागात थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु अंदाजे ८० टक्के लोकवस्ती ही उंच भागात वसलेली आहे. तिथे कायमच पाणी टंचाई भासत असते.
उंच भागात कलेश्वरवाडी , गावकरवाडी, सावंतवाडी, चितरमूळ अशा वाडी वस्त्या आहेत. कलेश्वरवाडीपासून गावकरवाडी, सावंतवाडी असा एक नाला वाहत असतो. या नाल्याला फक्त पावसाळ्यात पाणी असते. परंतु या नाल्याला खोऱ्यातच फार पूर्वी पासूनच उदभव विहिरी आहेत. या विहिरींतून वस्तीला पुरेल असे पाणी उपलब्ध होत असे. शिवाय सावंतवाडीच्या टोकाला नाल्यावर ओझर नावाचा दगडी नैसर्गिक धबधबा होता.
या धबधब्याच्या खालील बाजूस बारमाही वाहणारा पाण्याचा झरा होता. त्याचा फायदा होत असे. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन करण्यात आले आहे. घरांना भेगा पडणे असे प्रकारही घडले आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.कोकण रेल्वे सुद्धा या भागातून अवघ्या १०० ते २०० मीटरवरून गेली आहे. कसवण नाला येथे कोकण रेल्वेचे मोठे ब्रिज आहे. मात्र , याकडे महसूल विभाग पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.गावात राष्ट्रीय पेयजल योजना , जलस्वराज्य योजना आणि आता जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे. असे असताना शासनाचा महसूल विभाग खाण कामाला परवानगी देतो हा विरोधाभास आहे.
त्यामुळे पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी तसेच भूगर्भातील पाणीसाठा अबाधित राखण्याच्या दृष्टीने तांत्रिक व भुजलतज्ज्ञाची मते घेऊन कसवण गावातील खाणी ताबडतोब बंद करण्यात याव्यात.असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनाही देण्यात आली आहे.