कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पद्धतीने ऑनलाइन लॉटरी सुरू आहे. तसेच गुटखा, चरस, गांजा अशा अमलीपदार्थांची विक्रि राजरोसपणे होत आहे. हे सर्व अनधिकृत प्रकार तत्काळ बंद करण्यात अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शासनाने ऑनलाईन लॉटरी बंद केलेली आहे. तरीही जी.एस.टी.न भरता ठिकठिकाणी अनधिकृतरित्या स्टॉल टाकून लॅपटॉपद्वारे ऑनलाईन लॉटरी चालवली जात आहे. जिल्ह्यात सुमारे १८ ते २५ ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू झालेले आहेत. त्यांचे केंद्रस्थान कणकवली आहे. या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होते. हा ऑनलाईन जुगार तातडीने बंद करण्यात यावा.त्याचप्रमाणे मोठया प्रमाणात अमली पदार्थ विक्री केली जाते. अमली पदार्थ मुंबई - गोवा मार्गे जिल्ह्यात पोहचत आहेत. ते अमलीपदार्थ कोणत्या दिशेने, कोणत्या मार्गाने जिल्ह्यात आणले जातात याची माहिती घेतल्यास अमली पदार्थ पुरविणाऱ्यांच्या मुळापर्यंत पोहचता येईल. त्याचप्रमाणे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या गाडयांचे नंबर छोट्या अक्षरात लिहिले जातात. यासर्व अनधिकृत व्यवसायावर पोलिस यंत्रणेने व उत्पादन शुल्क विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी कारवाई करावी.
सिंधुदुर्गमधील अनधिकृत ऑनलाइन लॉटरी केंद्रे बंद करा, पोलिस अधिक्षकांकडे मनसेची मागणी
By सुधीर राणे | Published: October 13, 2023 4:13 PM