सावंतवाडी : आंबोली चौकुळ परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे आंबोलीतून चौकुळ मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. तर दुसरीकडे आंबोली घाटातील मुख्य धबधबा ही ओसंडून वाहत होता. तसेच सावंतवाडी आंबोली मार्गावर पाणीच पाणी झाले होते.
आंबोली चौकुळ परिसरात परतीचा पाऊस सद्यस्थितीत जोरदार बरसत आहे.ढंगाचा गडगडाट तसेच विजेचा कडकडाट सह जोरदार पाऊस कोसळत होता सायंकाळच्या सुमारास पावसाने हाहाकार माजवला तब्बल ४५ मिनिटे ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. त्यामुळे सावंतवाडी आंबोली ते चौकुळ अशा जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
कितीही पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी येत नाही. परंतु पावसाचे प्रमाण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी होते, असे तेथील जाणकाराचे म्हणणे आहे. दरम्यान या पावसानंतर आंबोली मुख्य धबधब्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत होता. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली.