सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृष पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान खात्याने तशा प्रकारचे संकेत राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकारची आपत्कालीन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पुढील तीन दिवसात जिल्ह्यात ढगफुटी सदृषपाऊस कोसळणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे येथून एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सध्या, सावंतवाडी व कुडाळ येथे त्यांना ठेवण्यात आले आहे.
हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. पण दोन दिवसांपूर्वी मुंबईसह उर्ववरित महाराष्ट्रात पाउस कोसळला होता. मात्र, कोकणला पावसाची झळ पोचली नव्हती. अधून मधून तुरळक सरी कोसळत होत्या. पण, पुढील चार दिवसात जिल्ह्यात ढगफुटी सदृष पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत राज्य सरकारला माहिती दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला सर्तक राहाण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून ही विशेष खबरदारी घेण्यात येत असून, पुणे येथून विशेष एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात मागवण्यात आल्या आहेत. यातील एक तुकडी शुक्रवारी सावंतवाडीत दाखल झाली आहे. या तुकडीने सावंतवाडी तालुक्यात ज्या, ज्या ठिकाणी भुस्खलन तसेच पाणी भरू शकते अशा ठिकाणाची माहिती घेतली. एनडीआरएफ टिमने शुक्रवारी सकाळी शिरसिंगे येथे जाउन गेल्या पावसाळ्यात जेथे भुसख्खलन झाले होते, तेथील जागेची पाहाणी केली. तसेच सांयकाळच्या सत्रात असनिये झोळबे येथील गावांनाही भेट दिली. तर बांदा येथे पुराचे पाणी येऊन अनेक व्यापाऱ्याचे नुकसान होते, त्या व्यापाऱ्यांशीही टिमने चर्चा केली.
या टिम मध्ये १९ जणाचा समावेश असून, ही टिम चार दिवस लेफ्टन कमांडर जस्टिन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत थांबणार आहे. त्यांसोबत डॉग स्कॉड तसेच बोटी सह अत्याधुनिक उपकरणेही आहेत. जिल्ह्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच शासनाने ही खबरदारी घेतली आहे. या टिमचे सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी स्वागत केले. तर, ढगफुटी सदृष पाऊस कोसळणार यांची माहिती हवामान खात्याकडून पूर्वीच आम्हाला प्राप्त झाल्याने हा खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही एनडीएआरएफची टिम मागवल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
खासदार राऊत यांच्याकडून एनडीआरएफ टिमशी चर्चा
खासदार राउत यांनी शुक्रवारी दुपारी सावंतवाडी येथे भेट देउन या एनडीआरएफच्या टिमशी चर्चा केली. तसेच त्यांना सिंधुदुर्ग बद्दल माहिती देत शिरसिंगे तसेच झोळबे व असनिये येथील गावाबाबत सूचना केल्या. त्यावेळी प्राताधिकारी सुशांत खाडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, तालुकाप्रमुख रूपेश राउळ नगरसेवक बाबू कुडतरकर,रूची राउत आदि उपस्थीत होते.