सिंधुदुर्ग: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमात आपलं भाषण मराठीतून केलं. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.
माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझे सिंधुदुर्गासोबतही संबंध आहेत. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचं प्रतिक आहे. मी 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले की, छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं की, माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो, असं ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील ज्योतिरादित्य शिंदे यांचं कौतुक केलं. प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या दोन वर्षात एक कोरोना बोकांडी बसला आहेच. पण काहीवेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावे लागते. अनेकदा असे जाणवते की, हे बोलणे कोरडे असते. पण ज्योतिरादित्य ही अशी व्यक्ती आहे की, त्यांनी स्वत:हून बैठकीची वेळ मागितली. काही बोलण्याआधी ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. असे वाटले मी केंद्रीय मंत्री आहेत आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांची नाळ या मातीशी जोडली आहे. इथे राजकारण येणार नाही. ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीयमंत्री असूनही त्यांची राज्यातील विमानतळांसंदर्भातील तळमळ दिसून आली. आपुलकीने विचापूर केली, असे नमूद करत ज्योतिरादित्य शिंदे मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत, याबाबत तुमचे अभिनंदन, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना काढले.
खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं-
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खोटे बोलणारी माणसे आवडत नव्हती हे खरे आहे आणि म्हणूनच खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतून काढून टाकले. नजर लावू नये म्हणून काळा टिका लावावा लागतो. तशीही माणसे आहेत. लघु का असेना, सूक्ष्म का असेना पण मोठे खाते तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल, याकडे पाहावे, अशी बोचरी टीका करत विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला, तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी सही केली. पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.