सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्गसह अन्य भागात सोमवारी कोसळलेल्या संततधार पावसाने मंगळवारी मात्र विश्रांती घेतली. सकाळपासून अधूनमधून लहान सरी कोसळत होत्या, तर सोमवारी झालेल्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरले होते. मात्र, पूर्णपणे पूर ओसरला असून, बांदा-सावंतवाडीसह दोडामार्गमधील जनजीवन सुरळीत झाले आहे. आंबोली घाटातील वाहतूकही रात्री सुरू झाली आहे. सोमवारी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत धो-धो पाऊस कोसळत होता. अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. एसटी बसचे वेळापत्रकही कोलमडले होते. मोती तलाव ओव्हरफ्लो झाला होता. बांदा परिसरात तेरेखोल नदीने पुराचा वेढा घातला होता; पण मंगळवारी पूर ओसरला असून, बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू होते. तळवडे, होडावडा तसेच कोंडुरा पुलावरील पूरही पूर्णत: ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. माडखोल येथे पाणी घुसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला असला, तरी रात्री उशिरा हे पाणी ओसरले होते. सावंतवाडी शहरातील मोती तलाव पूर्णत: पावसाने ओव्हरफ्लो झाला होता. दोडामार्ग तालुक्यातही पावसाने पूर्णत: उघडीप घेतली होती. अनेक गावांचा सोमवारी संपर्क तुटला होता. तळकट भागात अडकलेली एस.टी. रात्री उशिरा सावंतवाडीकडे परतली असून, एसटीचे वेळापत्रकही सुरळीत झाले आहे. पूर ओसरला माणगाव खोऱ्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने आंबेरी पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली होती, तर वसोली तसेच शिवापूर भागातही वाहतूक सुरळीत सुरू होती. एकंदरीतच सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ तालुक्यातील माणगाव व बांदा यांना सोमवारच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. परिस्थिती नियंत्रणात असून, सावंतवाडी तालुक्यात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कोणतेही नुकसान झाले नाही.
सिंधुदुर्गात जोर ओसरला
By admin | Published: August 03, 2016 1:01 AM