बांदा : डेगवे-मिरेखणवाडी येथील प्रथमेश उमेश सावंत (वय १७) या महाविद्यालयीन युवकाचा शनिवारी गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात अज्ञात तापाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले पंधरा दिवस तो अज्ञात तापाने आजारी होता. त्याच्या आकस्मिक निधनाने डेगवे गावावर शोककळा पसरली आहे. प्रथमेश हा सावंतवाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो सावंतवाडी येथे आपल्या मावशीकडे राहत होता. प्रथमेश याला ताप येत असल्याने १३ फेबु्रवारी रोजी तो डेगवे येथील आपल्या घरी आला. सकाळी त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तापाचे प्रमाण जास्त असल्याने व प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर बांबोळी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात तो कोमात गेल्याने उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. आज पहाटे उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालविली. आज दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथमेश हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. स्वभावाच्या जोरावरच त्याने मोठा मित्रपरिवार जोडला होता. दहावीत त्याला ८२ टक्के गुण मिळाल्याने त्याने पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकीची निवड केली. त्याने दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी चराठा येथील अच्युतराव भोसले अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल शाखेत प्रवेश घेतला होता. अभ्यासात हुशार असल्याने महाविद्यालयात तो परिचित होता. त्याच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. (प्रतिनिधी) घरातील एकुलता एक डेगवे मिरेखणवाडीत प्रथमेश हा आपले आई वडिल व लहान बहिणीसह राहत होता. घरातील तो एकुलता एक होता. आई वडिल शेती व मोलमजुरी करुन घर चालवितात. प्रथमेश हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचा त्यांना अभिमान होता. घराची पुढील सर्व जबाबदारीही त्याच्याच खांद्यावर येणार होती. मात्र, त्याला काळाने हिरावून घेतल्याने सावंत कुटुंबियांची सर्व स्वप्ने अधुरी राहिली आहेत. मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का त्याच्या कुटुंबियांना बसला होता. त्याच्या आईवडिलांना शोक अनावर झाला होता.
महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
By admin | Published: February 28, 2016 12:08 AM