मालवण : कोळंब न्हिवेवाडीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १० ते १७ जून पूर्ण न्हिवेवाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रतिमा भोजने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या कालावधीत वाडीतील कोणीही व्यक्ती बाहेर फिरणार नाही. फिरताना आढळल्यास एक हजार रुपये दंड व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विनामास्क व्यक्ती आढळल्यास १०० रुपये दंड करण्यात येईल. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर दिसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
पॉझिटिव्ह रुग्णांनी विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सूट असेल परंतु कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. वाडीत शासकीय कर्मचारी सोडून कोणालाही प्रवेश असणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.