कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्यावर नाहक टीका करण्यापेक्षा नाईक यांनी आणलेल्या निधीची माहिती घेण्यासाठी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमने-सामने यावे, असे जाहीर खुले आव्हान शिवसेना कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष तेली यांना दिले. तर नगराध्यक्ष तेली यांनी सर्वप्रथम ते कोणत्या पक्षात आहेत ते जाहीर करावे व नंतरच शिवसेनेवर बोलावे, असा सल्ला शिवसेनेचे नगरपंचायत गटनेते बाळा वेंगुर्लेकर यांनी त्यांना दिला.शिवसेना शाखा येथे संतोष शिरसाट व बाळा वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, नगरसेवक जीवन बांदेकर, सचिन काळप, नगरसेविका प्रज्ञा राणे, मेघा सुकी, श्रेया गवंडे, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, राजू गवंडे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आमदार नाईक यांनी आणलेला निधी कागदावर आहे असे सांगणाऱ्या नगराध्यक्ष तेली यांच्या टीकेला शिरसाट यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, तेली यांनी आमने-सामने यावे. मग कुडाळमध्ये आमदार नाईक यांनी किती निधी आणला व किती खर्च केला याचा लेखाजोखा आम्ही मांडतो. तेली यांना काँग्रेसच्या चिन्हावर नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिले. पण त्यांनी जनतेचा व काँग्रेसचा विश्वासघात केला. आजही त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष जाहीर करावा.केंद्रात भाजपची सत्ता आहे. कुडाळचे नगराध्यक्ष या नात्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून किती निधी आणला हेदेखील तेली यांनी जाहीर करावे. तसेच तेली यांनी वाढीव मूल्यांकनाप्रमाणे नको असलेली जागा कचऱ्यासाठी घेतली.
कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत २ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. परंतु काही बिल्डर, ठेकेदार यांच्याकडून होणाऱ्या फायद्यासाठी नगरपंचायतीने हा रस्ता आपल्या ताब्यात घेतला. हे देखील कुडाळवासीय विसरले नाहीत, अशी पोलखोल शिरसाट यांनी केली आहे.यावेळी राजन नाईक यांनी सांगितले की, तेली यांनी आमदार नाईक यांच्या विरोधात केलेली टीका ही केवळ राणे कुटुंबीयांना खूष करण्यासाठी केली. तेली यांनी विकासनिधी आणण्यासाठी कुठे कुठे गेले ते लक्षात घ्यावे, असा टोला लगावला.मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहासाठी १३ कोटीकुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहासाठी १३ कोटी निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केला व या नाट्यगृहाचे प्रत्यक्ष कामदेखील सुरू झाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या निधीतून हे काम होत असून तेली यांनी याची माहिती घ्यावी. आमदार नाईक यांचे कुडाळच्या सर्वांगीण विकासात फार मोठे योगदान आहे, असेही शिरसाट म्हणाले.