आचरा : कोकणातील गावपळीची परंपरा असणाऱ्या गावापैकी मालवण तालुक्यातील वायंगणी गावाची गावपळण सोमवारी सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे २००० वस्तीचा गाव देवासहीत व रयतेला घेऊन वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्रीसाठी वास्तव्यास गेला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली प्राचीन प्रथा आजच्या आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहातही ग्रामस्थ खुशीने जपत आहेत. सर्व जातीभेद विसरून वायंगणीचे ग्रामस्थ एकोप्याने श्रध्देने गावपळणीत सहभागी झाले. श्रध्दा म्हणून गावपळण करत असताना गाव निर्मनुष्य होऊन गावचे वातावरण शुध्द होण्यास ग्रामस्थ हरप्रकारे हातभार लावताना दिसत आहेत. वायंगणीतील ग्रामस्थांनी या काळात राहण्यासाठी आचरा, हिर्लेवाडीे, कालावल, सडयेवाडी, चिंदर सडेवाडी भागात राहुट्या केल्या आहेत. गुरे, ढोरे, कोंबडी आदींसह लागणारे साहित्य घेऊन या राहुट्यांमध्ये वास्तव्यास वायंगणीवासीय रवाना झाले. तीन दिवस आणि तीन रात्री गावातील ग्रामस्थ एकत्र राहत निसर्गाच्या सानिध्यात स्वत:ला सामावून घेतात. यावेळी त्यांना मोबाईल व्हॉटस्अॅपचाही विसर पडतो. (वार्ताहर)देवपळणीसह गावपळण सडेवाडी येथे वास्तव्यइतर गावामध्ये होणाऱ्या गावपळणीत फक्त गावातील ग्रामस्थ गावाबाहेर जातात. परंतु वायंगणीचे ग्रामदैवत श्री रवळनाथ हे गावपळणीच्या दिवशी पहाटे ३.३० च्या सुमारास मानकऱ्यांसह चिंदर सडेवाडी येथे वास्तव्यास जाते. त्या ठिकाणी असलेल्या घुमटीत देवाचे प्रतिक असलेले श्रीफळ ठेवून त्यांची पूजाअर्चा होते. यावेळी गावातील ग्रामस्थ देवाच्या सानिध्यात वेशीबाहेर वास्तव्य करतात. देवपळण व गावपळण यांचा संयुक्त मिलाफ या वायंगणी गावच्या गावपळणीत पहावयास मिळतो.१७ रोजी परतीचा कौलश्री देव रवळनाथच्या कौलाने वेशीबाहेर गेलेला गाव तीन दिवस तीन रात्रीनंतर देव रवळनाथ यांच्या हुकमाने भरला जातो. तीन दिवसांची मर्यादा १७ रोजी पूर्ण होत असून यावेळी गावचे बारापाच मानकरी व ग्रामस्थ सकाळी १० च्या सुमारास गाव भरल्याचा कौल घेणार आहेत. देवाने कौल दिल्यास वेशीबाहेर गेलेला गाव परत वायंगणी गावात परतणार आहे.
देवाच्या आदेशाने वायंगणी गाव वेशीबाहेर
By admin | Published: March 14, 2016 11:11 PM