कणकवली : तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून आशिये गावातील जनतेने संपूर्ण शाळा डिजिटल बनविण्याचा लोकवर्गणीतून यशस्वी केलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. ज्या लोकांना दूरदृष्टी असते, असे गाव विकासात कधीच मागे रहात नाही. आशिये गावच्या विकासातील सातत्य टिकविण्यासाठी मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून नेहमीच वचनबद्ध आहे, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.आशिये येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून संपूर्ण डिजिटल करण्यात आली आहे. या डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती महेश गुरव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, सरपंच शंकर गुरव, उपसरपंच प्रवीण ठाकूर, माजी सरपंच भाई ठाकूर, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, सदानंद बाणे, दिगंबर सावंत, केंद्रप्रमुख शुभांगी दळवी, पोलिसपाटील गुरुनाथ खानोलकर, रश्मी बाणे, मानसी बाणे, शाळा समिती अध्यक्ष अनिल गुरव, सुनील बाणे, मुख्याध्यापक चांदोस्कर, शिक्षिका लाड, टिकले, मंगेश लाड, आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, आशिये गावातील लोक भावी पिढी सज्ञान व्हावी, यासाठी जागरूक आहेत. याचा मला अभिमान वाटतो. शासन निधी देईल आणि आपण शाळा डिजिटल करू म्हणून वाट बघता न थांबता गावातील लोकांनी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी आर्थिक ताकद निर्माण करून भविष्यातील काळाची गरज ओळखून विज्ञान आणि तंत्रज्ञानासारखी शिक्षण यंत्रणा तयार केली. यावेळी राणे यांनी, सरकार शाळेसाठी निधी देत असेल तरच सरकारच्या प्रतिनिधींना अशा कार्यक्रमात मानसन्मान मिळेल, अन्यथा निमंत्रण ही मिळणार नाहीत, डिजिटल शाळांच्या शुभारंभप्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांवर बहिष्कारच टाका, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर उपसभापती महेश गुरव म्हणाले, आशिये गावाची १९९० सालची आणि आताची परिस्थिती यांच्यामध्ये फरक आहे. नारायण राणे आमदार झाल्यानंतर आशिये गावात विकास झाला. यावेळी त्यांनी आशियेतील महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाल्याचे सांगितले. नितेश राणे विकासकामांना निधी देत असल्याने या बांधीलकीतून येथील जनता काँग्रेसशी एकनिष्ठ आहे, असे सांगितले.
आशियेच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध
By admin | Published: January 04, 2017 9:43 PM