वैभववाडी : अरुणा मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या शेवटच्या माणसाला योग्य पुनर्वसन, नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला व अन्य सेवा सुविधांचा लाभ मिळत नाही; तोपर्यंत प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष करीत राहील. त्यासाठी एकत्रित लढा देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहूया, असे आवाहन आखवणे भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सचिव दत्ताराम नागप यांनी नुतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.आखवणे येथे अरुणा मध्यम प्रकल्प समितीच्यावतीने बांधण्यात आलेल्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन आखवणे भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई अध्यक्ष रामकृष्ण शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागप बोलत होते.
व्यासपीठावर स्थानिक अध्यक्ष आकाराम नागप, सचिव डॉ. जगन्नाथ जामदार, उपाध्यक्ष रघुनाथ कदम, पुर्नवसन समिती अशासकीय सदस्य डॉ. व्यंकटेश जामदार, सरपंच अनंत सुतार, संतोष मोरे, विश्वनाथ नागप, अनिल नागप, जगन्नाथ नागप, तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास जामदार, बबन बांद्रे, सुरेश नागप आदी उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या नुतन कार्यालयात संगणक कक्षाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. समितीचे सचिव दत्ताराम नागप यांनी गेल्या दोन वर्षाच्या समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्पग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल, अशी ग्वाही नागप यांनी दिली.
यावेळी व्यंकटेश जामदार, संतोष मोरे, अध्यक्ष रामकृष्ण शेलार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक डॉ. जगन्नाथ जामदार यांनी केले. यावेळी रतन नागप, प्रकाश नागप, पांडुरंग जामदार यांच्यासह आखवणे, भोम व नागपवाडी येथील प्रकल्पग्रस्त उपस्थितीत होते.