सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अवकाळी पडणारा पाऊस आणि अनिश्चित हवामानातील बदल व नेहमीच ढगाळसदृष्य वातावरणामुळे आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी फळबागांवर विपरीत परिणाम झालेला आहे. तरी शासनस्तरावर प्रति हेक्टर १ लाख रूपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची भेट घेऊन अवकाळी पडणारा पाऊस, हत्तींचा उपद्रव आणि अन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच नेहमीच असणाऱ्या ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे आंबा, सुपारी, काजू, नारळ आदी फळबागायतींवर विपरीत परिणाम झाला आहे. झाडावरील मोहर अवकाळी पावसाळी कुजून गेला आहे. जिल्ह्यातील बागायतदार पूर्णपणे आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. शासनस्तरावर दुर्लक्ष केले जात आहे. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या बागायतीच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात रानटी हत्तींनी धुडगुस घातलेला आहे. गेली अनेक वर्षे हत्तींचा त्रास सुरू आहे. त्यामुळे जीवितहानीबरोबरच माडबागायती, केळी बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या रानटी हत्तींचा डिगस, हिर्लोक, ओरोस, कुंदे या भागात वावर आहे. हत्तींचे कळप लाखो रूपयांचे नुकसान करीत आहेत. मोठमोठ्या बागायती नष्ट करीत आहेत. तरी या नुकसानीपोटी वनखात्याकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवून द्यावी. हत्तींबरोबरच गवा रेडे, माकड यांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी त्रासला असून शेती, फळबागायती यांपासून दूर होण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
हेक्टरी १ लाखाची नुकसान भरपाई द्या
By admin | Published: December 15, 2014 10:10 PM