कणकवली : नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना मूळ किंमत व आताची वाटप कींमत याची प्रत द्या , असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी कदम यांना दिले आहेत . मात्र , त्यानंतरही याबाबतची कार्यवाही करण्यास कदम यांनी नकार दिला आहे . त्यामुळे जोपर्यंत मोबदल्याबाबतचे मूळ किंमतीचे विवरणपत्र आम्हाला मिळत नाही , तोपर्यंत मोबदला रक्कम न स्विकारण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम असल्याची माहिती नरडवे धरणग्रस्त समितीचे संतोष सावंत यांनी दिली आहे .याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीतर्फे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासमवेत सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेण्यात आली . मोबदला वाटपाबाबत मूळ किमतीचे विवरणपत्र मिळत नाही , तोपर्यंत मोबदला वाटप करू नये , अशी यावेळी आम्ही धरणग्रस्तांनी त्यांच्याजवळ मागणी केली .यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेश ढवळ , लुईस डिसोजा , संतोष सावंत , प्रकाश सावंत . हनुमान शिंदे , अशोक जाधव, मधुकर शिंदे यांच्यासह अन्य नरडवे धरण ग्रस्त उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मंगेश जोशी यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली . लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडून मिळालेल्या नोटिसीमध्ये मालमतेची मूळ रक्कम किती आहे ? हे समजत नाही . मोबदला वाटपात प्रचंड तफावत दिसत आहे . परिणामी धरणग्रस्तांचे नुकसान होणार आहे . त्यामुळे मूळ किमतीचे विवरणपत्र दिल्याशिवाय मोबदला वाटप करु नये , अशी मागणी आम्ही प्रकल्पग्रस्तांनी केली .प्रकल्पग्रस्तांना वाटप करावयाच्या रकमेचे मूळ किमतीचे विवरणपत्र मिळाले पाहिजे . तसेच याप्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी . मात्र , तसे न करता वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .त्याला आमचा विरोध असल्याचेही प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याचे संतोष सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.-- फोटो ओळ - सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नरडवे धरणग्रस्तांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संदेश पारकर उपस्थित होते.