रत्नागिरी : महाराष्ट्राची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. येथील लोककला, नाट्यकला, विविध कलांची जोपासना होणे आवश्यक आहे. राज्याची ही संस्कृती अनंतकाळ टिकावी, यासाठीच राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यगृह उभारण्यावर शासनाचा भर राहणार आहे. जेथे नाट्यगृह असेल, तेथे ते अधिक सक्षम करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे रविवारी बोलताना केले. येथील सावरकर नाट्यगृहात रविवारी सायंकाळी राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१५ प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रत्नागिरीत कार्यक्रम होत असलेल्या सावरकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठीही शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल. त्याबाबतची इतर जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषदेने उचलावी, असेही तावडे म्हणाले. पुरस्कार वितरणानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अकादमीरत्न (फेलो) तुळशीदास बोरकर यांचा पंडित विजय बक्षी व शिवानंद डेगलुरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश शेवडे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक मान्यवरांच्या हस्ते राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१५ चे वितरण करण्यात आले. त्यामध्ये नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर, सत्यपाल चिंचोळकर (कीर्तन व समाजप्रबोधन), दत्तोबा भडाळे (कलादान), रामदास कामत (नाट्यक्षेत्र), पंडित विजय बक्षी (कंठसंगीत), डॉ. उषाताई पारखे (उपशास्त्रीय संगीत), पं.रमाकांत म्हापसेकर (वाद्यसंगीत), गुरू दत्तराज बोपन्ना बोडे (नृत्य), हिरामण बडे (तमाशा), शाहीर बाळ जगताप (शाहिरी), आशाताई मुसळे (लोककला), ठका कृष्णा गांगड (आदिवासी गिरिजन) यांचा समावेश होता. डॉ. उषाताई पारखे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र राजीव पारखे यांनी पुरस्कार स्वीकारला. (प्रतिनिधी) मुंबईतही नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा राज्यात लोकप्रिय असलेली नाट्यकला अधिक जोपासता यावी, अभिनयाबाबतचे दर्जेदार प्रशिक्षण येथील लोकांना मिळावे, यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाची शाखा मुंबईतही सुरू केली जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली.
प्रत्येक जिल्ह्यात सक्षम नाट्यगृह
By admin | Published: February 01, 2016 12:51 AM