सावंतवाडी ,दि. ०६ : सावंतवाडीतील स्पर्धा परीक्षा केंद्राचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दूरसंचारच्या एज्युकेशन विंगची मदत घेतली जाईल. हे केंद्र अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकार नगरपालिकेला सर्व सहकार्य देईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्री केसरकर यांनी शनिवारी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, सभापती आनंद नेवगी, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, गोविंद वाडकर, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते.
सावंतवाडीतील स्पर्धा परीक्षा केंद्रावर ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. अजून थोडे काम शिल्लक आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतरच या केंद्राचे उद्घाटन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हे केंद्र चालविण्यासाठी दूरसंचारच्या एज्युकेशन विंगकडे देण्याचे निश्चित झाले आहे. त्याची विंग संपूर्ण राज्यात अशी केंद्रे चालवित आहेत.
इंटरनेट तसेच अन्य अद्ययावत तंत्रज्ञानही या विंगकडे उपलब्ध असल्याने त्यांनी चालवायला घेतल्यास त्याचा अधिकचा फायदा हा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणार आहे. अनेक चांगले अधिकारी आपणास दिसतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दूरसंचारच्या इंटरनेट सेवेबाबत जर काही तक्रारी असतील तर त्याबाबत आम्ही दूरसंचारशी खास बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. त्यांचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. तसेच दूरसंचारची एज्युकेशन विंग राज्यात अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असल्याने त्याचा चांगला अनुभव इतर ठिकाणी आहे. त्यामुळेच आम्ही या विंगची निवड केली आहे. तसेच इतर काहींनी नगरपालिकेशी संपर्क केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.