सिंधुदुर्गनगरी : निवडणूकी संदभार्तील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजगतेने व समन्वयाने कामकाज पार पाडावे, आचारसंहितेबाबत नागरिकांना तक्रार करावयाची असेल तर 1950 या क्रमांकावर तक्रार करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल चव्हाण यांनी येथील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या बैठकीत केले.बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल आॅफिसर आदी अधिकारी उपस्थित होते.लोकशाहीच्या जागरात महत्वपूर्ण भूमिका व जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळत आहे या दृष्टीकोनातून निवडणूकीच्या कामाकाजाकडे पहावे असे सूचित करुन चव्हाण म्हणाले की, या बैठकीत विविध कमिट्यांची व विविध कार्यालयीन अधिकारी वगार्ची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, निवडणूक संदर्भात कायदे, आदर्श आचार संहितेबाबत घ्यावयाची खबरदारी, सभा, मिरवणूक, लाऊड स्पीकर आदी परवानग्या देण्याची पद्धती आदी बाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून सर्वांना माहिती दिली जाईल. याचा अभ्यास करावा व समन्वयाने सर्व कामकाज पार पाडावे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पी.पी.टी च्या माध्यमातून आदर्श आचार संहिता, विविध पथकांची कार्यप्रणाली, निवडणूक विषयक कायदे व भंगाबाबतच्या शिक्षा या बाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांचे सण, धार्मिक सण साजरे करताना आदर्श आचार संहिता पालनाबाबत कटाक्षाने लक्ष घालावे. पण जे आचार संहितेत नाही त्याचा बाऊ करुन नागरिकांना नाहक त्रास देणे टाळावे.
सेक्टर आॅफिसरनी केवळ मतदान केंद्रापुरते लक्ष न देता त्याच्या परिसराचा सुद्धा सखोल अभ्यास करावा अशा सूचना या बैठकीत केल्या. शेवटी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी आभार मानले.