वैभववाडी : कुसूर मधलीवाडी येथील भक्ती भरत पाटील ही नवविवाहित भाजल्याप्रकरणी तिचा भाऊ सूरज सत्यवान तळेकर याने पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी बहिणीचा पती व सासूवर भक्तीच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. गेल्या बुधवारी १० एप्रिलला सकाळी गंभीररित्या भाजलेल्या भक्तीवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
भक्तीचा भाऊ सूरज याने शुक्रवारी वैभववाडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘भक्ती भरत पाटील (पूर्वाश्रमीची सायली सत्यवान तळेकर, कुसूर-पिंपळवाडी) हिचा गावातीलच भरत वसंत पाटील याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला. भरत हा सध्या गावातीलच माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. लग्न झाल्यापासून पती आणि सासू सतत भक्तीचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. दरम्यानच्या काळात त्यांना दोन मुले झाली. त्यामुळे आता तरी तिचा छळ कमी होईल, अशी आम्हांला अपेक्षा होती.
परंतु, भक्तीचा पती आणि सासूच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही. उलट त्यांच्याकडून त्रास देणे सुरुच राहिले. त्यामुळे १ एप्रिल रोजी भक्ती पुन्हा माहेरी आली होती. सतत होणाºया त्रासामुळे आम्ही तिला माहेरीच राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती ८ एप्रिलपर्यंत माहेरी आमच्याकडेच होती. तिचा पती भरत हा गावातील काही प्रतिष्ठीत लोकांना घेऊन ८ एप्रिलला आमच्या घरी आला. त्यावेळी सोबत आलेल्या प्रतिष्ठित लोकांनी समजावल्यामुळे भरत आणि त्याच्या आईच्या वर्तनात सुधारणा होईल, आणि सुखाचा संसार करतील या भाबड्या आशेवर आम्ही पुन्हा तिला सासरी पाठविले होते.
त्यानंतर तिची खुशाली विचारण्यासाठी गेल्या बुधवारी १० रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास फोन केला असता पहाटे ५.३० च्या सुमारास जेवण करीत असताना भक्ती भाजली असल्याचे तिच्या पतीने मला सांगितले. पती आणि सासूच्या त्रासामुळेच हा सर्व प्रकार घडला असावा, असा संशय भक्तीचा भाऊ सूरज याने तक्रार अर्जात व्यक्त केला. पती आणि सासू या दोघांनी तिचा सतत छळ केला आहे. त्यामुळे या दोघांनीच तिचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संंशय तक्रार अर्जात व्यक्त करीत या प्रकरणाची चौकशी करून आपल्या बहिणीला व आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणीही सूरजने पोलिसांकडे केली आहे.जबाबानंतर पुढील कार्यवाही : बाकारेकुसूर येथील भक्ती भरत पाटील या नवविवाहितेचा भाऊ सूरज तळेकर याने आपल्याकडे शुक्रवार १२ रोजी अर्ज दिला आहे. दरम्यान, भक्ती जिल्हा रुग्णालयात असताना सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तिचा जबाब घेतला आहे. सध्या तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. तिच्या भावाच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने येत्या एक दोन दिवसांत कोल्हापुरात जाऊन भक्तीचे जबाब घेतले जातील. त्यानंतर तिच्या जबाबानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी स्पष्ट केले.