कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या संदर्भात जेवढ्या तक्रारी आहेत त्यांचे निरसन एका महिन्यात केले जाईल. प्रत्येक महिन्याला त्या कामाचा आढावा घेतला जाईल असे कोल्हापूर येथील प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच टॉवरची रेंज का जाते आणि नवीन टॉवर उभारण्यासाठी कोणत्या गोष्टींची कमतरता राहिलेली आहे त्याचाही आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यात नव्याने १५७ बीएसएनएलचे टॉवर कोठे-कोठे मंजूर झाले आहेत याची यादी यावेळी जाहीर करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएलच्या संदर्भात समस्यांचा सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे प्रधान महा प्रबंधक यांच्यासमोर पाढा वाचला. कणकवली येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. दरम्यान आमदार राणे यांनी जनतेच्या तक्रारींचे निरसन कसे करणार, त्याचे वेळापत्रक ठरवा, प्रत्येक टॉवरचे नेटवर्क सुरळीत करा. ही सर्व कामे निर्धारित वेळेमध्ये करा अशा सूचना केल्या. आमदार राणे यांना मतदार संघात गावभेटीदरम्यान बीएसएनएलच्या नेटवर्क संदर्भातील अनेक तक्रारी येतात. याबाबत मुंबई येथे दूरसंचार निगमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा केल्यावर कोल्हापूर येथील महाप्रबंधकांच्या उपस्थितीत कणकवली येथे बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार मतदारसंघातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींची विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीला भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएलचे सावंतवाडी उपमहाप्रबंधक आर.वी.जाणू, कणकवली येथील ज्युनियर ऑफिसर नेरकर, सब डिव्हिजन इंजिनियर देवगडचे कैलास पायमोडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या. काही गावांमध्ये टॉवर असून रेंज नाही. टॉवर योग्य जागी नसल्याने सर्वदूर रेंज पसरत नाही. असे अनेक प्रश्न यावेळी मांडले. बीएसएनएलने आपले नेटवर्क वाढवावे. असलेले टॉवर सुरळीत सुरू ठेवावेत. जे टॉवर नवीन निर्मिती करायचे आहेत त्याचे करार चुकीच्या पद्धतीने करून घेतले जात आहे. प्रत्येक टॉवरची स्थिती रेंज ४जी, ३जी, २जी या संदर्भात चर्चा झाली. सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे नोंद करून घेऊन त्यावर महिन्याभरात काम केले जाईल आणि सेवा सुरळीतपणे दिली जाईल. त्या सेवेचा आढावा सातत्याने घेतला जाईल असे आश्वासन अरविंद पाटील यांनी यावेळी दिले.
'बीएसएनएल'च्या संदर्भातील तक्रारीचे निरसन एका महिन्यात करणार, प्रधान महाप्रबंधकांचे आश्वासन
By सुधीर राणे | Published: October 07, 2023 5:56 PM