वैभववाडी : करूळ धनगरवाडी ही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या वाडीला त्वरित सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे आमदार नितेश राणे यांनी केली.हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथील विधानभवनात आमदार राणे यांनी ग्रामविकासमंत्री मुंडे-पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करूळ धनगरवाडी मागील ६० वर्षांपासून रस्ता, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या सुविधांची तेथील ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी केलेली असताना त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळेच दुर्गम, डोंगराळ भागातील गोरगरीब जनतेला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.करुळ धनगरवाडीकडे जाणा-या सुमारे ३ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रस्त्यातील ३ छोटे पूल बांधणे व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करणे ही कामे आवश्यक आहेत. त्यामुळे या सुविधा विनाविलंब पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिका-यांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
करूळ धनगरवाडीच्या समस्या ग्रामविकासमंत्र्यांच्या दरबारी, नितेश राणेंचे निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:21 PM