मालवण : सी-वर्ल्ड पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांच्याकडे देण्यात आली असून, ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्याची शासनाची भूमिका राहणार आहे. केवळ ४५० एकर जागेत प्रकल्प साकारण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलीे.मालवण दौऱ्यावर असलेल्या मंत्री रावल यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे मालवमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, एमटीडीसीचे व्यवस्थापक गोविंदराज, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, डॉ. सारंग कुलकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री रावल म्हणाले की, सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वायंगणी ग्रामस्थ सकारात्मक आहेत. या सर्वांना एकत्र आणत आमदार त्यांच्या समस्या जाणून घेतील. सुरुवातीच्या प्रकल्पातील जागा कमी करून घेण्यात आमदार नाईक यांची भूमिका महत्त्वाची होती. ग्रामस्थांना जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा. यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले.सी-वर्ल्ड मार्गावर मोनोरेल उभारणारसिंधुदुर्गात चिपी येथे राष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत आहे. गोवा राज्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. गोवा येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांना गोवा ते मालवण सी-वर्ल्ड हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होण्यासाठी गोवा ते सी-वर्ल्ड या मार्गावर मोनोरेल उभारण्याबाबत पर्यटन विभाग निश्चितच विचार करेल, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सी-वर्ल्ड पूर्ण करु
By admin | Published: April 04, 2017 8:17 PM