सिंधुदुर्ग : घरकुल आवास योजनेत ८२ टक्के काम पूर्ण करीत राज्यात पहिला क्रमांक पटकावला याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन. मात्र, पुढील शंभर दिवसांच्या अभियान कालावधीत १०० टक्के काम करून जिल्ह्यातील बेघरांना घरकुल देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूया.
आवास दिन म्हणजे केवळ इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास एवढ्यापुरतेच मर्यादित नसून जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचीही घरकुले पूर्ण झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती पूर्ण झाली तरच खऱ्या अर्थाने आवासदिन साजरा केल्याचे समाधान मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हास्तरीय महाआवास अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठीची कार्यशाळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक तथा ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील तसेच विविध खात्यांचे अधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.यावेळी उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही २८६ लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी खास सभा घेऊन सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना या सभेमध्ये बोलवावे आणि हा जागेचा प्रश्न ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल अशा ठिकाणी जागा देऊन सोडवावा. तसे नियोजन करावे.याचबरोबर जिल्ह्यात प्रकल्प हवेत यासाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी आपल्या जागा दिल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना अद्यापही घरकुले देता आलेली नाहीत. अशांची यादी काढावी आणि त्यांची घरे पूर्ण करावीत.घरकुल आवास योजनेत सिंधुदुर्ग राज्यात पहिलाप्रभारी प्रकल्प संचालक दीपाली पाटील म्हणाल्या, जिल्ह्याने घरकुल आवास योजनेमध्ये ८१ टक्के गुण मिळवित महाराष्ट्रात नंबर एक मिळविला आहे. तर देशात जिल्ह्याचा ९२ वा क्रमांक आहे. जिल्ह्यात बेघर असलेल्या व्यक्तींपैकी एकूण २९७ व्यक्तींना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या जमिनी नव्हत्या. यापैकी देवगडमधील अकरा जणांना जमिनी देऊन त्यांचे घरकुल उभारण्यात यश आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत २८६ लाभार्थी जमीन नसल्याने घरकुलापासून वंचित आहेत. सन २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्यासाठी ४ हजार ९४७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी ३ हजार १४३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर १८०४ घरकुलांना मंजुरी देणे बाकी आहे. यावर्षीसाठी एकूण १५४७ नवीन घरकुलांचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील बेघर लोकांना घरकुले मिळावीत यासाठी जमीन खरेदीसाठी मिळणारी रक्कम ही फार तुटपुंजी आहे आणि सिंधुदुर्गातील जमिनींचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करण्यासाठी मिळणारा निधी वाढवून मिळावा.- डॉ. हेमंत वसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील कातकरी आदिवासी समाज बांधवांकडे अद्यापही जातीचे दाखले नाहीत. अशा व्यक्तींना खास कॅम्प घेऊन त्यांना जातीचे दाखले मिळतील यासाठीची रचना करा. जेणेकरून त्यांना घरकुले देताना येणारी जागेची अडचण दूर होईल- मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग