सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठीची भूसंपादन मोजणी प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाली आहे. या मोजणीत आलेल्या इमारती, घरे, मालमत्ता, झाडे यांचे मोजमाप सुरू आहे. हा अहवाल एका महिन्यात येताच नुकसानभरपाईचा आकडा निश्चित होईल. ओरोस तिट्टा येथे उड्डाणपुलाचा समावेश करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली.मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या मोजणीत आलेल्या मालमत्तेचे मोजमाप सुरू आहे. तसेच ज्या बेकायदेशीर इमारती, स्टॉल, टपऱ्या आहेत, त्यांचीही मोजमापे घेण्यात येत आहेत. या बेकायदा बांधकामांना नुकसानभरपाई द्यावी की देऊ नये याबाबतचा निर्णय शेवटी घेतला जाईल. मात्र, तत्पूर्वी जी घरे कायदेशीर इमारती, अन्य सार्वजनिक मालमत्ता तसेच झाडांचे मूल्यांकन करून ती नुकसानभरपाई संबंधितांना देण्याचा प्रयत्न आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.बाजारभावापेक्षा जास्तच नुकसानभरपाई मिळणारनुकसानभरपाई जास्तच असणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असा दर देण्यात येईल. रेडीरेकनरचे जे दर आहेत ते काही ठिकाणी बाजारभावाच्या दराच्या जवळपास आहेत त्यांना बाजारभावाच्या तुलनेत मोठी नुकसानभरपाई मिळेल. मात्र, ज्या भागात रेडीरेकनरचे दर कमी असतील त्यांना जास्त नुकसानभरपाई कशी देता येईल, याचा प्रयत्न केला जाईल व त्यांनाही बाजारभावाच्या तुलनेत नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न केला आहे. जी घरे व इमारती वगळणे शक्य आहे त्याचा विचार करून ते वगळण्याचा विचार होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ओरोस तिट्ट्यावर उड्डाणपूलओरोस तिट्टा येथे ‘बॉक्सेल’ पद्धतीचे पूल चौपदरीकरण आराखड्यात नमूद आहे. सिंधुदुर्गनगरी हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने नगरीचे सौंदर्य वाढावे यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येईल. तसा बदल आराखड्यात करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.पाणीटंचाई कामे थांबविलीजिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने आता जिल्ह्यातील पाणीटंचाईची कामे थांबविण्यात आली आहेत. यावर्षी पाणीटंचाईची झळ मोठी बसली नसून टंचाईची बहुतांशी कामे मार्गी लागली असल्याचेही सांगण्यात आले.जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, याबाबत प्रशासन व पोलीस विभागाची बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल व यासाठी उपाययोजना केल्या जातील व असे गुन्हे घडू नयेत म्हणून दक्षता घेण्यात येईल.
भूसंपादन मोजणी पूर्ण
By admin | Published: June 18, 2015 12:18 AM