राजापूर : तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवीच्या घटनेनंतर त्याबाबतची वृत्ते प्रसिद्ध होताच कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील खदखदणारा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संशयास्पद भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित प्रभारी मंडल अधिकाऱ्याची अन्यत्र बदली करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतूनच दबक्या आवाजात सुरु झाली आहे.येथील कृषी कार्यालयातील कामकाजाचा लॅपटॉप पळविण्यात आल्याची घटना घडताच खळबळ उडाली होती. कार्यालयातील अंतर्गत कामकाजाचा कानोसा घेता एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचेच काम त्यामधून झाल्याचे पुढे आले आहे. त्याला संबंधित कृषी मंडल अधिकारीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. लॅपटॉप चोरीप्रकरणानंतर आता कृषी विभागातील अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत.यापूर्वी पाचल विभागात काम करताना याच मंडल अधिकाऱ्याने तेथील कर्मचाऱ्यांना त्रास दिला होता. त्यामुळे त्याची राजापूरला बदली केली गेली. तथापी राजापुरातदेखील त्याने तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपद्रव द्यायला सुरुवात केली. त्यातूनच लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती असतानादेखील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत नरोवा वा कुंजरोवा अशीच भूमिका घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.हे प्रकरण आता चांगलेच तापणार, याची कुणकुण लागताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे तत्काळ पाठवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे, तर आपल्याला नाहक मनस्ताप दिला जात असून, त्याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने तालुका कृषी सहाय्यकाने आता कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवी प्रकरणातून संबंधित कृषी कार्यालयातील अंतर्गत संघर्ष उग्र रुप धारण करण्याच्या मार्गावर असून, या मंथनातून अनेक प्रकरणे आता बाहेर पडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)
संघर्ष अखेर चव्हाट्यावर
By admin | Published: March 31, 2015 9:43 PM